अमरावती : इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक ‘सरल’मध्ये नोंदवून त्याची खात्री करून घ्यावी, असे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. आधार नोंदणीकरिता ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणावर भर दिला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची सर्व गटशिक्षणाधिकारी व संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत.
शालेय प्रवेशासह विविध शैक्षणिक सुविधांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने पालकांना अनेकदा सूचना केल्या आहेत. परंतु, अद्यापही इयत्ता पहिली ते बारावीतील जिल्ह्यातील ५ लाख ११ हजार ६७१ पैकी ३ लाख ३३ हजार ३५८ विद्यार्थ्यांचेच आधार अपडेट करण्यात आले आहेत, तर १ लाख ७८ हजार ३१३ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नाहीत.त्यामुळे सरल प्रणालीत या विद्यार्थ्यांच्या नोंदी नाहीत. परिणामी आता विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्यावतीकरण तातडीने करावे, असे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबधित यंत्रणेला दिले आहेत.
बॉक्स
शिक्षण विभागाकडून व्यवस्था
शालेय विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाकरिता पंचायत समिती स्तरावर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरिता प्रत्येक तालुक्यात दोन ऑपरेटर व यंत्र सामग्रीसुद्धा पुरविली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कोट
विविध शैक्षणिक सुविधांसाठी ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी फायदेशीर ठरेल. त्यामुळे आधार नाेंदणीकृत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संबंधित पालकांनी शिक्षण विभागाकडे तातडीने जमा करावे.
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)