(फोटो)
तीन महिन्यांत १४ वाघांचा मृत्यू, वन्यजीव विभागासह प्रादेशिक वनविभागालाही निर्देश
परतवाडा : वाघांच्या मृत्यूच्या घटनेतील वाढ बघता, वाघांच्या संरक्षणाकरिता विशेष माेहीम राबविण्याचा व तातडीने अतिरिक्त उपाययोजना करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी वन्यजीव विभागासह प्रादेशिक वनविभागाला दिले आहेत.
जानेवारी ते मार्च २०२१ च्या अखेरच्या कालावधीत विविध कारणांनी वाघांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. या कालावधीत राज्यात एकूण १४ वाघांचा मृत्यू झाल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी स्पष्ट केले आहे.
वाघांच्या संरक्षणार्थ राज्यातील सर्व वन्यजीव क्षेत्रात तसेच वाघाचा अधिवास असणाऱ्या प्रादेशिक वनविभागासह वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. यात वाघांकरिता संवेदनशील क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रातील फासे, जाळे, तत्सम पिंजरे हुडकून काढण्यासह रात्रीच्या वेळी विशेष गस्त व शिकार प्रतिबंधक उपायययोजनांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून शिकारीवर आळा घालण्यात येणार आहे.
विशेष व्याघ्र संरक्षण दलाचा वापर करून वाघाच्या आश्रयस्थळांच्या भागात पायी गस्त वाढविली जाणार आहे. आकस्मिक भेटीवर भर देत संवेदनशील क्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असून, पाणस्थळांवर विशेष लक्ष दिल्या जाणार आहे. ज्या वनक्षेत्रात संरक्षणाकरिता कुत्र्यांची चमू (डॉग स्कॉड) उपलब्ध आहे, त्या डॉग स्कॉडचा गस्तीच्या कामासाठी योग्य व पूर्ण क्षमतेने वापर केला जाणार आहे.
वाघांच्या संरक्षणार्थ राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत स्थानिक कर्मचारी आठवडी बाजारासह त्यांचे नियतक्षेत्रात आढळणारे संशयित, नवीन व्यक्ती यांच्या जंगलातील हालचालीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
वाघांच्या मृत्यूच्या, अनैसर्गिक मृत्यूच्या घटना टाळण्याकरिता वाघाचा अधिवास असलेल्या प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्रात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती अंतर्गत विभागीय वनअधिकारी (दक्षता) एच.एस. वाघमोडे यांनी अमरावती, अकोला, बुलढाणाख, मेळघाट (प्रादेशिक)च्या उपवनसंरक्षकांना स्वतंत्रपणे दिले आहेत. उपवनसंरक्षकांनी आपल्या अधिनस्त सर्व सहायक वनसंरक्षकांसह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळविले आहे.
बॉक्स
व्हॉट्सॲप
वाघांच्या संरक्षणार्थ राबविण्यात येणारी विशेष मोहीम व करावयाच्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आवश्यक ते सर्व निर्देश उपवनसंरक्षकांना, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक वनरक्षकापर्यंत पोहचवावे, तर विभागस्तरावर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संनियंत्रण करून माहितीचे आदानप्रदान करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी राज्यस्तरावर दिले आहेत.
बॉक्स
सोमवारी आढावा
प्रादेशिक वनविभागासह वन्यजीव विभागाच्या मुख्यवनसंरक्षकांना, वनसंरक्षकांना, अधिनस्त क्षेत्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक सोमवारी आढावा घ्यावा लागणार आहे. केलेली कार्यवाही व अभिप्राय त्यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना कळवावा लागणार आहे.