अमरावती : यंदा पावसाने दडी मारली. नक्षत्रामागून नक्षत्र कोरडेच गेले. जून उलटला. जुलैैचा पहिला पंधरवाडा उलटला तरी पावसाचा मागमूसही नव्हता. परिणामी पेरण्या लांबल्या. ज्यांनी पावसावर भरवसा ठेवून पेरण्या आधीच उरकल्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन खरेदी केलेली महागडी बियाणी घरातच पडून होती. एकंदरीत जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट भासत होते. परंतु दोन दिवासांपूर्वी वरूणराजा मेहेरबान झाला अन् समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. रखडलेल्या पेरण्यांना दोन दिवसांच्या पावसामुळे वेग आला आहे. परंतु पेरण्यांना तब्बल दीड महिना विलंब झाल्याने यंदा अनेक पिके बाद झाली आहेत. मूग, उडदाचा कालावधी केव्हाच उलटून गेलाय. पारंपरिक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला कालावधी उशिरा आलेल्या पावसामुळे आता मिळणार नसल्याने अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक बदल आवश्यक झाला आहे. हा बदल स्वीकारून जिल्ह्यातील शेतकरी नव्या ‘पॅटर्न’नुसार पेरण्यांची तयारी करीत आहेत. म्हणजेच पीक बदल शेतकऱ्यांनी स्वीकारल्याचे चित्र आहे. पावसाअभावी यंदा मूग, उडीद, सोयाबीनचा पेरा काही तालुक्यांमध्ये घटणार आहे. कपाशीच्या पेऱ्यात वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहे. तुरीचा पेरा वाढण्याचे संकेत आहे. वरूडमध्ये २७ हजार हेक्टरमध्ये कपाशीवरूड तालुक्यात ८० टक्के पेरणी आटोपली आहे. तालुक्यातील एकूण पेरणीक्षेत्र ५६ हजार हेक्टर असून यंदाच्या हंगामातील पावसाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक बदल केल्याचे दिसते. तालुक्यात तब्बल १५ हजार हेक्टरमध्ये शेतकरी मिरचीचे पीक घेत आहेत. तर २७ हजार हेक्टरमध्ये यंदा कपाशीचा पेरा झाला आहे. रोखीचे पीक समजले जाणाऱ्या सोयाबीनचे पेरणीक्षेत्र यंदा घटले असून अवघ्या ६ हजार हेक्टरमध्येच सोयाबीनची पेरणी झाली आहे. ९ हजार हेक्टरमध्ये तूर तर २२०० हेक्टरमध्ये ज्वारीची पेरणी झाली आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे उर्वरित २० टक्के पेरण्यांनाही वेग आला आहे. नांदगावात ५८ हजार हेक्टरमधील पेरणी शिल्लकनांदगाव खंडेश्वर तालुुक्यात केवळ १२.८४ हेक्टरमधील पेरण्या आटोेपल्या आहेत. तालुक्यातील एकूण ७८ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रांपैकी ६६ हजार ९८१ हेक्टर इतके पेरणीयोग्य क्षेत्र आहेत. सद्यस्थितीत ८ हजार ६०६ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. तालुक्यातील सोयाबीनचे पेरणीक्षेत्र ५ हजार ८१५ हेक्टर असून १ हजार ५४८ हेक्टरमध्ये कपाशी, १ हजार १५९ हेक्टरमध्ये तूर, ७२ हेक्टरमध्ये मूग, १२ हेक्टरमध्ये उडदाची पेरणी झाली आहे. तालुक्यात आजच्या तारखेमध्ये गतवर्षी ११२.५ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. तर यंदा आजच्या तारखेमध्ये केवळ १२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पेरणीचा पॅटर्न बदलला
By admin | Updated: July 16, 2014 23:50 IST