अमरावती : शिवशाही बसमध्ये आढळलेली ६० किलो ३९१ ग्रॅम चांदी परत घेण्यासाठी दोन सुवर्णकारांनी संपर्क साधला असला तरी फ्रेजरपुरा ठाण्यापर्यंत अद्याप कुणी आलेले नाही. नागपूरच्या राधाकृष्ण कुरिअरमार्फत कोल्हापूरहून नेल्या जात असलेल्या या मौल्यवान धातूच्या बॉक्समध्ये ५० किलो चांदीबाबत बिले मिळाली आहेत. ती खरी की बनावट, याच्या पडताळणीसाठी पोलीस विक्रीकर विभागाकडे दाखल झाले आहेत.
चालकाने नागपूर मार्गावरून परत आणलेल्या बसमधून ४० लाख ५९ हजार किमतीची चांदी फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी जप्त केली. या चांदीच्या साठ्यासोबत ५० किलोच्या पावत्या मिळाल्या. त्यात कोल्हापूरहून सहा व्यापाऱ्यांनी नागपुरातील सहा व्यापाऱ्यांसाठी ही खेप पाठविली असल्याचे उघड होते. त्यापैकी दोघांनी पोलिसांशी फोनवर चौकशी केली तरी ते प्रत्यक्षात पुढे आले नाहीत. त्यामुळे ते व्यापारी कोणते, त्यांच्याकडे अधिकृत पावत्या आहेत किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याशिवाय उर्वरित १० किलो चांदीचे काय गौडबंगाल आहे, याचा तपास फ्रेजरपुरा पोलिसांना करायचा आहे.
दरम्यान, सदर पावत्यांची पडताळणी करण्यासाठी त्या विक्रीकर विभागाकडे पोलिसांनी पाठविल्या आहेत. आयकर विभाग याप्रकरणी कारवाई करणार होते. तूर्तास पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेऊन चोरी माल असल्याच्या संशयावरून गुन्हा नोंदविला.
---------------
सदर चांदी नागपुरच्या राधाकृष्ण कुरिअर सेवेच्या माध्यमातून नागपूरला जात होती. त्यांच्या राज्यात अनेक ठिकाणी शाखा आहे. अद्याप कुठल्याही व्यापाऱ्यांनी या चांदीचे अधिकृत जबाबदारी घेतली नाही. चौकशी सुरू आहे.
पुंडलीक मेश्राम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक