वरुड : वरुड नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. पुढील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीच्या सदस्यासाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातील सदस्य केवळ विदर्भ जनसंग्राम संघटनेकडे असल्याने वरुड नगरपरिषदेत सत्तांतराचे संकेत प्राप्त झाले आहे.
सन
२0११ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेवर आली. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या हेमलता कुबडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या कैसरजहॉ अन्सारखा विराजमान आहेत. नगरपरिषदेमध्ये सध्या शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस २, जनसंग्राम ५, वरुड विकास आघाडी ३ आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पुढील नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीकरिता आरक्षित राहणार आहे. सन
२0११ च्या वरुड नगरपरिषेदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन उपजिल्हा प्रमुख राजू काळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला ८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्त्वात पाच जागा तर कॉग्रेसला नरेशचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन जागा मिळविता आल्या. आ. अनिल बोंडे यांच्या विदर्भ जनसंग्राम संघटनेने पहिल्यांदाच या निवडणुकीत उडी घेऊन पाच उमेदवारांना विजयी केले. वरुड विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष उमेश यावलकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवून आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. ते स्वत: पराभूत झाले असले तरी दोन जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवारामध्ये चंदू ऊर्फ प्रमोद कडू यांनी या निवडणुकीत बाजी मारली.