धारणीतील अपहरण नाट्यावर पडदा : मावसभावासोबत होते प्रेमसंबंधधारणी : शहरात मागील तीन दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या नवविवाहितेच्या अपहरण नाट्यावर अपहृताच्याच बयाणानंतर अखेर पडदा पडला. आपण प्रियकरासोबत स्वत:च्या मर्जीने गेल्याचे विवाहितेने शनिवारी पोलिसांना सांगितल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामुळे धारणीसह जिल्हा पोलिसांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.३१ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता शहरातील नवविवाहितेचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला. पतीने पोलीस ठाणे गाठून याची लेखी तक्रार नोंदविली. मात्र, धारणी शहरातील मुख्य मार्गावरुन अपहरण करुन नेत असतानाच तिने आरडाओरडा न केल्यामुळे हे प्रकरण संशयास्पद वाटत होते. कारण अपहरणस्थळावरुन सदर चारचाकी वाहन धारणी शहरातूनच मध्यप्रदेशात गेले होते. पोलिसांत दिलेल्या तक्रारीतसुध्दा तिने प्रतिरोध केल्याचे स्पष्ट होत नसताना अपहरणासारखा गंभीर गुन्हा घाईगडबडीत दाखल करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. अपहरणकर्ता हा तिचा मावसभाऊ व प्रियकर असल्याचेही स्पष्ट झाले. पोलिसांनी अचलपूर येथील विद्यार्थिनींच्या प्रकरणांची धास्ती घेत धारणीतील प्रकाराबाबत गुन्हा नोंदविताना घाई केली. एलसीबीची चमूसुध्दा रात्रभर 'सर्चिंग आॅपरेशन' करीत होती. मात्र, रविवारी सायंकाळी अपहरणकर्ता व अपहृताला ठाण्यात आणल्यावर तिने स्वत:च्या मर्जीने गेल्याची कबुली देताच हे अपहरण प्री-प्लॅन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अखेर नाट्यमय अपहरणावर पडदा पडला. (तालुका प्रतिनिधी)
प्रियकरासोबत पळाल्याची ‘तिने’ दिली कबुली
By admin | Updated: August 3, 2014 23:03 IST