चांदूर बाजार : स्थानिक आठवडी बाजार कोरोना संसर्गामुळे बंद असल्याने भाजीपाला पाळीव जनावरांना खाऊ घालण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आठवडी बाजार बंद असल्याने सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
तालुक्यातील ग्रामीण परिसरात शेकडो शेतकरी आपल्या शेतात तीन गुंठ्यापासून ते ६० गुंठ्यांमध्ये बारामाही भाजीपाला उत्पादन घेऊन प्रपंचाचा गाडा हाकत आहेत. गतवर्षी कोरोनाच्या प्रथम लाटेत पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये सदर शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. त्यामुळे त्यांचे जीवनमान कोलमडले. अर्थचक्र थांबले. शासनाने हळूहळू लॉकडाऊन रद्द करून पूर्णत: मोकळीक दिली. परिणाणी, सदर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
यावर्षी उधार-उसनवार करून पैशांची जुळवाजुळव करीत शेतकऱ्यांनी पुन्हा भाजीपाला पेरला. ते नव्या जोमाने कामाला लागले होते. लागवडीसाठी एकरी ५० हजार रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी टोमॅटो, वांगी, कोथिंबीरसह इतर भाजीपाला पिकाची पेरणी केली. सदर भाजीपाला मालाच्या दोन-तीन तोडणीतून शेतकऱ्यांच्या हाती बऱ्यापैकी रक्कम आली. परंतु, चार आठवड्यांपासून शासनस्तरावर गावोगावीचे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जाहीर केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील विविध गावांतील आठवडी बाजार बंद केल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात विकता आलेला नाही.
प्रपंचाचा गाडा चालवावा कसा?
सदर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतात पिकविलेला तसेच तोडून ठेवलेला भाजीपाला पाळीव जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. या नुकसानामुळे प्रपंचाचा गाडा कसा चालवावा. उधार उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा, असा यक्षप्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या आठवडी बाजार बंदचा फटका काही प्रमाणात भाजीपाला खरेदी-विक्री करणाऱ्यांवरही झाला आहे.
चहुकडून कोंडी
महावितरण कंपनीकडून घरगुती वीज बिल वसुली व विविध बँकांकडून कृषिकर्ज परतफेडीसाठी कर्जदार शेतकऱ्यांकडे चकरा घालणे सुरू आहे. अशा परिस्थितीत या नुकसानग्रस्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी कर्जाची, वीज देयकाची परतफेड कशी करावी, हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
फोटो व कोट यायचा आहे.