(फोटो वापरणे)
अमरावती : महानगरात मुळात अधिकृत वाहनतळांची संख्या नावापुरतीच आहे. इमारती, संकुल बांधकामाला वाहनतळाची जागा न सोडतानाही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या वाढली असून, महापालिका सहसंचालक नगरविकास विभागाचा हा प्रताप असल्याचे बोलले जात आहे. त्यात भर म्हणजे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दिवसेंदिवस संख्या वाढतच आहे. पुरेसे वाहनतळ नसल्याने रस्त्यावर वाहने लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा परिणाम रहदारीस अडथळा होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
अमरावती महानगरात वाहनतळांची संख्या मुळातच कमी आहे. महापालिकेने चार ते पाच वाहनतळासाठी आरक्षित भूखंड जागा मालकांकडून विकसित करून घेतले. मात्र, त्यावर टोलजंग व्यापारी संकुले उभी राहिली. परंतु, वाहनतळांचा वापर होत नाही. अमरावती महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बीओटीवर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबविण्याची तयारी केली होती. मात्र, तेदेखील गुलदस्त्यात आहे. हल्ली नेहरू मैदान, गांधी चौक येथे अधिकृत वाहनतळ आहे. मात्र, आजूबाजूला अतिक्रमण, दुकानांनी वाहनतळ वेढले आहे. जयस्तंभ चौकातील महापालिकेच्या प्रियदर्शनी व्यापारी संकुलातील वाहनतळ गायब झाले आहे. व्यापारी संकुलातील वाहनतळ दिसत नाही, तर वाहने कुठेही रस्त्यावर उभी केली जातात. पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने वाहने टोईंग करून नेण्याचे तसेच दुचाकी उचलून नेऊन दंड आकारण्याचे प्रकार केले आहेत. मात्र, वाहनतळांची जागा नाहीच, असे चित्र आहे.
-------------------
शहराची लोकसंख्या : ८ लाख ५० हजार
दुचाकी संख्या : ६ लाख ७० हजार ४९७
चारचाकी वाहनांची संख्या : ६५ हजार २७९
------------------
मुख्य रस्ते सर्वाधिक त्रासदायक
शहरातील मुख्य परिसरात वाहनतळाची सर्वात गंभीर समस्या आहे. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार, राजापेठ, अंबादेवी मार्ग, सराफा बाजार याठिकाणी वाहनांमुळे तासंतास वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहनतळे ताब्यात घेतल्याने याच भागात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.
---------------
- तर वाहनमालकांवर कारवाई
१) रस्त्यावर वाहने उभी केल्यास कलम १२२ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. त्यानुसार ५०० ते १००० दंड होऊ शकतो. मात्र, वाहतूक पोलीस शाखेने वाहतुकीला शिस्त लावू, परंतु कायद्याने जे अधिकार पोलिसांना दिले आहेत, त्याचा वापर करू असे म्हटले आहे.
२) वाहतूक पोलिसांची वाहने मेन रोडसारख्या भागात फिरत नाही, ते कॉलेज, गर्दी नसलेल्या भागात फिरतात. तेथेही केवळ धवनीक्षेपकावरून समज दिली जाते. त्यामुळे काहीच उपयोग होत नाही.