अमरावती: नजीकच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत कचर्यापासून खत निर्मिती व कोळसा तयार करण्याच्या प्रकल्पासाठी लागणारी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात येथील उपविभागीय कार्यालयात शुक्रवारी बैठक पार पडली. एकूण १८ हेक्टर जमीन ताब्यात घेतली जाणार असून महापालिकेतर्फे खरेदीची प्रक्रिया आटोपली आहे. अमरावती नगरपरिषद, महापालिका स्थापनेपासून शहरात निघणारा घनकचरा हा सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत साठविला जातो. या घनकचर्याची विल्हेवाट लावणे नितांत गरजेचे असताना कचर्याचा थर हा जमिनीपासून ५० ते ६० फूट उंचीपर्यंत पोहोचला आहे. कम्पोस्ट डेपो ‘ओव्हर फ्लो’ झाला तरीही कचरा साठविणे सुरूच आहे. परिणामी प्रदूषण विभागाने महापालिकेला नोटीस बजावून कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्ती केली. त्यानुसार प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राट प्रक्रिया राबविली. मुंबई येथील इको फिल टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. कंपनीकडे कचर्यापासून खत निर्मिती व कोळसा तयार करण्याची जबाबदारी सोपविली. हा कंत्राट ३० वर्षांकरिता देण्यात आला असून प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा करारही झाला आहे. एका वर्षाच्या आत हा प्रकल्प सुरु करून कचर्याची विल्हेवाट लावणे कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. त्याकरिता पाच लाख रूपये अनामत रक्कम म्हणून महापालिकेने जमा करुन घेतली आहे. पूर्वीच्या नऊ हेक्टर जागेवर क म्पोस्ट डेपो असून ही संपूर्ण जागा ठिसूळ झाली आहे. परिणामी या जागेवर प्रकल्पाचे बांधकाम करणे अशक्य होते. त्यामुळे प्रशासनाने नवीन जागा खरेदीचा निर्णय घेतला. १८ हेक्टर जागा खरेदीची प्रक्रियासुद्धा पार पडली. मात्र जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया खर्या अर्थाने शुक्रवारपासून सुरू झाली. एकदा जमीन ताब्यात आली की संबंधित कंत्राटदाराला जागा हस्तांतरीत केली जाईल, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी) सुकळी येथे सद्यस्थितीत अशाप्रकारे कचरा जमा झाला आहे. शहरातील ठिकठिकाणचा कचरा कन्टेनरच्या साह्याने येथे टाकला जातो.
कम्पोस्ट डेपोसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
By admin | Updated: May 10, 2014 23:57 IST