अमरावती : मंगरूळ दस्तगीर येथे कार्यरत पोलिसाचा अज्ञात कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ते मंगळवारी सकाळी मॉर्निंग वाॅक करीत असताना जुना टोल नाक्यासमोरील रस्त्यावर ही घटना घडली.
विलास रामदास शेकार (४४, रा. अर्जुननगर) असे मृताचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर विलास शेकार हे रस्त्यावर पडून होते. यादरम्यान याच मार्गाने मॉर्निंग वाॅक करणारे चांदूर रेल्वे ठाण्यातील पोलीस नाईक गजेंद्र ठाकरे (४१, रा. दत्तविहार कॉलनी) यांना रस्त्यावर गर्दी दिसली. त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता, विलास शेकार हे त्यांना गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजेंद्र ठाकरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.