निर्णय स्थगित : ४० कोटी बाकी; इंगोले, भारतीय, शेखावत कर्मचाऱ्यांच्या बाजूनेअमरावती : महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकातील द्यावयाच्या ४० कोटी रुपयांच्या थकबाकीवर सदस्यांमध्ये घमासान झाले. विलास इंगोले, बबलू शेखावत वगळता सर्वच सदस्यांनी थकबाकीची रक्कम देण्याची परिस्थिती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. तिजोरीत पैसा जमा करावा. त्यानंतर थकबाकीची रक्कम घ्यावी, असे स्पष्ट मत मांडले. शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ७८ अन्वये प्रशासकीय विषयान्वये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचऱ्यांना १ जानेवारी २००६ ते ३१ डिसेंबर २००९ या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगाच्या फरकातील रक्कम प्रदान करणे व धोरण ठरविणे याविषयी चर्चा करण्यात आली. ही फरकाची रक्कम ४० कोटींच्या घरात असल्याची माहिती लेखापाल शैलेंद्र गोसावी यांनी दिली. विलास इंगोले यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची बाजू घेत त्यांना फरकाची रक्कम द्यावी लागेल. अटी शर्तीच्या अधीन राहून हा विषय मंजूर करुन तिजोरीत रक्कम येईल तेव्हा कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही बाब त्यांनी ठामपणे मांडली. प्रकाश बनसोड यांनी महापालिकेचा पैसा स्विस बँकेत जमा आहे का, असे म्हणत प्रशासनाची हल्ली आर्थिक परिस्थिती विशद केली. ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया ’ असा कारभार सुरु असताना प्रशासनाने हा विषय आणलाच कसा, असा प्रश्नदेखील उपस्थित केला. वेतन, कंत्राटदाराचे थकीत, दैनंदिन सफाई कंत्राटदाराची देयके असे अनेक प्रश्न उभे असताना ४० कोटी रुपये कोणत्या शीर्षातून देणार, असे म्हणत हा विषय फेटाळण्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चेतन पवार यांनी प्रशासनाने ४० कोटींची थकबाकीची रक्कम मंजूर करण्यासाठी सभागृहात पाठविण्यामागील भूमिकेसंदर्भात संशय व्यक्त केला. महापालिका बंद करायची आहे काय? तिजोरीत ठणठणाट असताना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम कोठून देणार, असा सवाल उपस्थित केला. दिगंबर डहाके यांनी कामचुकार कर्मचारी शोधून काढा, ही महापालिका आपली असून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करा, महापालिकेची दयनीय अवस्था झाली असून ती कसी सुधारणार याविषयी कोणीही अधिकारी कर्मचारी बोलत नाही. त्यामुळे विहिरीत पाणीच नाही तर काढणार काय? हा विषय स्थगित ठेवण्याच्या सूचना केल्या. यावेळी इम्रान अशरफी, जयश्री मोरे, वसंतराव साऊरकर, कांचन ग्रेसपुंजे, प्रदीप बाजड, प्रशांत वानखडे आदींनी सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा करण्याचा विषय फेटाळून लावला. दरम्यान बबलू शेखावत, तुषार भारतीय यांनी कर्मचाऱ्यांची मागणी न्यायीक आहे. त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळालीच पाहिजे. याविषयी मधला मार्ग काढून कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देणे आवश्यक आहे. संभ्रमावस्था दूर करुन याविषयी लवकर तोडगा काढण्याची भूमिका तुषार भारतीय यांनी मांडली. दरम्यान बबलू शेखावत यांनी ४० कोटींच्या थकबाकीबाबत महापौरांच्या दालनात बैठक घेण्याच्या सूचना करीत हा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.
वेतन थकबाकीवर घमासान
By admin | Updated: July 19, 2014 23:41 IST