२५ हजार लोकसंख्येचे पथ्रोट व शेजारच्या सहा-सात खेड्यांतून आठवड्यातून एकदा भरणाऱ्या शुक्रवारच्या बाजाराला नागरिकांची एकच गर्दी होत होती. अर्धा बाजार मुख्य रस्त्यावर भरत होता. त्यामुळे व्यापारी वर्ग व बाजारहाट करण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना वाहन काढणे कठीण झाले होते. याबाबत कित्येकदा व्यापारी वर्ग व नागरिकांनी ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रारी मांडल्या. मात्र, त्या तक्रारींकडे आजपर्यंत लक्ष दिले गेले नाही.
नव्याने रुजू झालेल्या ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन बाजारातील रस्ते, सिमेंट ओटे, बाजारातील नाल्या, पथदिवे या सुविधा पुरविल्या. भाजी बाजार, धान्याबाजार, किराणा ओळ, मटण मार्केट, मच्छी मर्केट, मुर्गा मटण ओळ, कापड दुकान ओळ, झाडू, मनहारी ओळ आदीची प्रत्येक ओळीत फलक लावून प्लास्टिक बॅग न वापरण्याबाबत ताकीद दिली. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तक्रारींना वाट मोकळी केली तसेच आठवडी बाजाराला शिस्त लावल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.