सुरेश सवळे - चांदूरबाजारतालुक्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणजे संत्रा. दरवर्षी संत्रा उत्पादनातून सुमारे ७०० कोटींची उलाढाल होते. गेल्या मृगात पाऊस नसल्यामुळे मृगबहार फुटलाच नाही तर यंदा आंबिया बहराची फळे झाडावरच पिवळी होऊ होऊन जमिनीवर गळत आहे. या अज्ञात रोगाने ग्रासलेल्या संत्रा फळांमुळे संत्रा उत्पादकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. चांदूरबाजार तालुक्यात १० हजार ३०६ हेक्टर क्षेत्रात संत्रा झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यात २८ लाख ५४ हजार ७६२ झाडे आहेत तर उत्पादन देणारी संत्रा झाडे ८ हजार ९४३ हेक्टरमध्ये आहे. यात २४ लाख ७७ हजार २११ झाडावर संत्रा उत्पादक आंबिया व मृग बहाराची फळे घेतात. यात सर्वाधिक उत्पादन आंबिया बहाराच्या फळापासून होते. यंदा कधी नव्हे इतका समाधानकारक आंबिया बहाराची फळे झाडावर होती. त्यामुळे संत्रा उत्पादक उत्साहित होता. इतर वेळी संत्रा फळांची गळण सर्व साधारण होती. आधी या फळाला झाडावरच तडा जाऊन ते फळ जमिनीवर येत होते. आता ही फळे झाडावरच टिकविण्यासाठी काय उपाय योजना करावी, असा प्रश्न पडला आहे. याबाबत कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञ सुद्धा शेतकऱ्यांचे सामाधान करु शकले नाहीत. या संत्रा गळतीचा परिणाम सर्वाधिक चांदूरबाजार तालुक्यात झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक संत्राक्षेत्र शिरजगाव कसबा परिसरात आहे. त्यात गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत काही संत्रा उत्पादकांनी या गळतीची कारणमिमांसा कृषी तज्ज्ञांपासून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘कॉकबेन’ या रोगाने संत्रा फळांना ग्रासल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यावर उपाय सांगितला नाही. जी फवारणी करण्याचा सल्ला काही कृषी तज्ज्ञांनी दिला त्याचा वापर काही संत्रा उत्पादकांनी या आधीच केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आता संत्रा उत्पादकांनी आपल्या बागेतच जाणे थांबविले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन संत्रा उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची मागणी शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादक संघ व विदर्भ संत्रा उत्पादक संघाने केली आहे.
कोट्यवधींची संत्री जमिनीवर
By admin | Updated: August 14, 2014 23:29 IST