स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : महाआॅनलाईनने विकसित केले सॉफ्टवेअरअमरावती : या आठवड्यात कुठल्याहीक्षणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज व शपथपत्र भरावे लागणार आहेत. उमेदवारांना ही प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आयोगाने महाआॅनलाईनच्या माध्यमातून सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या संकेतस्थळावर जाऊन उमेदवाराला त्यामध्ये स्वत:ची नोंदणी करावी लागणार आहे. या ठिकाणी उमेदवारांची माहिती सेव्ह करून ठेवता येते व आवश्यकतेनुसार दुरुस्तीदेखील करून व त्याचे प्रिंट आऊट काढून व त्यावर स्वाक्षरी करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावे लागणार आहे. अशाप्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. उमेदवारांना उमेदवारी अर्ज व शपथपत्र भरण्यास अडचण येऊ नये, यासाठी मदत केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच सायबर कॅफे व सी.एफ.सी.ची मदत घेण्यात येणार आहे. ८ जानेवारीच्या निर्णयान्वये उमेदवारांना आता शपथपत्रे स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्यकता नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आवश्यक ती प्रमाणपत्रे व पक्षातर्फे निवडणूक लढवीत असल्याबाबत पक्षाचा अध्यक्ष, सचिव यांच्या शाई किंवा बॉलपेनने स्वाक्षरी केलेले नमुना २ अ व नमुना २ ब सादर करावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अर्ज संगणकाद्वारे भरावयाचे नसून ई-मेलद्वारेही देता येणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची च्या निवडणुकांसाठी १२०० ते १४०० मतदारांचे मतदार केंद्र राहणार आहे. मतदार केंद्रावर सुव्यवस्थित खोल्या, शौचालय, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, रॅम्प, सुरक्षा भिंत इत्यादी सुविधा राहणार आहेत. कोणत्याही कारणास्तव मतदान व मत मोजणीचे दिवशी वीज पुरवठ्यात खंड होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. सहा महिन्यांत घ्यावे लागणार जात वैधता प्रमाणपत्र : राखीव प्रभागातून सदस्य पदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोच पावती उमेदवारी अर्जासोबत जोडण्याची मुभा देण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. शपथपत्राचा गोषवारा लावणार मतदान केंद्रांवरउमेदवारांच्या शपथपत्रामागील माहितीचा गोषवारा निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतपत्रिकेवरील अनुक्रमांकानुसार स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धी देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रासमोर, मतदारांना सहज वाचता येईल, अशा पद्धतीने फ्लेक्स लावण्यात येतील.उमेदवारी अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यकउमेदवारी अर्जासोबत मत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमिबाबतचे द्यावे लागणारे शपथपत्र, सत्यप्रती, जात वैधता प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र ही कागदपत्रे आवश्यक राहणार आहे.मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भरस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्के असली तरी, यावेळी आणखी टक्क्ेवारी वाढावी यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ, महाविद्यालये, उद्योग समूह, अशासकीय संस्था, बँका, हॉटेल्स येथे जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
आॅनलाईन राहणार उमेदवारी अर्ज, शपथपत्र
By admin | Updated: January 10, 2017 00:28 IST