चांदूरबाजार : शहरातील शासकीय तथा निमशासकीय कार्यालयांत शिस्तीचा फज्जा उडाला असून नियमांची पायमल्ली करीत कर्मचारी कार्यालयातच धूम्रमान करीत आहेत.पोलीस, सैन्य, डॉक्टर या व्यवसायात गणवेशाला विशेष महत्त्व आहे. परंतु इतर शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र शासन उदासीन आहे. शासकीय कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर सेवकांपर्यंत विविधरंगी पोषाख वापरताना दिसतात. जिन्स पॅन्ट, टी शर्ट, स्पोर्ट शू, हातात कडे, बोटात ४ ते ५ अंगठ्या अशा पेहरावात कर्मचारी कर्तव्य बजावतात. भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत हा विचित्र प्रकार अशोभनीय आहे. काही शिक्षक जिन्स पॅन्ट, शार्ट टी शर्ट, तोंडात खर्रा घेऊन अध्यापन करतात. तेव्हा शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर ड्रेसकोडची सक्ती करणे आज गरजेचे झाले आहे. शासकीय कार्यालयांत धूम्रपान करण्यावर बंदी असताना आज त्याच ठिकाणी जास्त प्रमाणात धूम्रपान होताना दिसून येत आहे. परंतु ही बाब फक्त भिंतीवर फलक लावल्यापुरताच मर्यादित राहिली आहे. जेव्हापासून हा कायदा अमलात आला तेव्हापासून एकाही धूम्रपान करणाऱ्यावर कारवाई झाल्याचे उदाहरण नाही. जि.प. शाळांच्या शिक्षकांना ड्रेसकोड सक्तीचा करण्यात आला. परंतु त्याचे पालन वरिष्ठांच्या सभा, राष्ट्रीय सण याच दिवशी होताना दिसतो. आज शासकीय कार्यालयात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याही गणवेशाबाबत कार्यालयीन वरिष्ठ अधिकारी उदासीन दिसून येतात. सध्या देशात सत्ता परिवर्तन होऊन केंद्रात मोदी सरकार आले आहे. एक शिस्तप्रिय प्रधानमंत्री म्हणून मोदी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या काळात याबाबतीत परिवर्तन होण्याची आशा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, जि. प. अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कार्यालयीन कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेशाची सक्ती होणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्यालयात शिस्तीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. बऱ्याच पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस कर्मचारी साध्या गणवेशात वावरताना दिसतात. त्यावर नियंत्रण प्रस्तावित होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तर केव्हा केव्हा डॉक्टर कोण व रुग्ण कोण हेसुद्धा ओळखणे कठीण होते. एसटी महामंडळातील चालक-वाहकांना शासनाकडून गणवेश पुरविले जाते. परंतु बरेच वाहनचालक त्याचा वापर करीत नाहीत. एकंदरीत शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र या गोष्टी सक्तीचे होणे गरजेचे आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची ओळख होण्यास मदत होईल. कार्यालयीन शिस्त कायम राहून एक वेगळा पायंडा निर्माण होईल. यासाठी शिस्त ही महत्त्वाची आहे. (शहर प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांचा उद्रेक
By admin | Updated: August 30, 2014 01:07 IST