पान २ ची बॉटम
चांदूर बाजार : तंबाखूमुळे कर्करोग होतो, असे कितीही इशारे वैज्ञानिकांनी दिले असले तरी तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची सवय सुटायला तयार नाही. उलट तंबाखू सेवनाचे नवेनवे प्रयोग तंत्रयुगात विकसित होत असून, गुटखा खाण्याची सवय जडलेल्या शौकिनांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानात खर्रा तयार करून देणारी मशीन अनेक पानटपरीवर दिसायला लागली आहे. ख-र्याची चव घेण्यात नवी पिढी व्यस्त झाली आहे.
ख-र्याच्या नादी लागलेले अनेक बाबा पूर्वी ''रत्नांच्या'' प्रेमात आकंठ बुडायचे. परंतु कालांतराने विमलने या प्रेम प्रकरणात उडी घेतल्याने तंबाखूच्या त्रिकोण बराच काळ गाजला. काही तंबाखू प्रेमींनी ''सितार'' हाती घेत थेट ''गोव्याची'' सहल करून अनेकांनी गुटखाप्रेम सिद्ध केले. यात काही उच्चभ्रू लोकांना ‘उचिपसंद’ खाण्याचाही समावेश होता. खिशाला परवडत नाही म्हणून आपली तहान भागविण्यासाठी विविध प्रकारच्या तंबाखूचे ब्रॅण्ड बाजारात आले. त्यानंतर तंबाखूपासूनच निर्मित गुटख्याचा जन्म झाला.
व-हाडी, मजा, ठावकर, नागपुरी यासारख्या ख-र्याचे शौकीन वाढले असल्याने पानटपरीवर ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच खर्रा घोटून देताना होणारी दमछाक थांबवण्यासाठी पानटपरी चालकांनी अनेक नवीन उपकरणांना जन्म दिला. आता खर्रा घोटण्यासाठी चक्क इलेक्ट्रिक मोटर लावलेली आधुनिक मशीन उपलब्ध झाली आहे. शासनाने खेड्यापासून तर शहरापर्यंत गुटखा खाणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली व त्यापासून होणारे कॅन्सरचे अनेक आजार होत असल्याने शासनाने गुटखा बंदीचा निर्णय जाहीर केला. मात्र, पोलीस व अन्न औषधी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटखा दामदुप्पट भावाने तोही खुलेआम विकला जात आहे.
बॉक्स
लाखो रुपयांची उलाढाल
गुटख्यावर प्रतिबंध घालण्यात आला. कायदा झाला. मात्र, गुटखा नव्या रुपात आणि काळ्या बाजाराच्या माध्यमातून शौकिनांच्या सेवेत हजर झाला. या गुटख्याची आवड आता पूर्वीप्रमाणे राहिली नसून पानटपरीवर घोटलेला खर्रा खाण्याची क्रेज नव्या पिढीत रुजू लागली आहे. आता तर खर्रा घोटून देणारी मशीन बाजारात दाखल झाली. हा खर्रा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुपारी व तंबाखूचा वापर केला जातो. यामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते.
अल्प भांडवलात व्यवसाय
आज शहर असो की, ग्रामीण भाग. पानटपऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. बाराशे लोकसंख्या असलेल्या छोट्या खेड्यातील चौकात चार ते पाच पानटपरी दिसून येतात. ग्रामीण भागात बेरोजगार युवकांसाठी पानटपरी हा अल्पभांडवलाचा व्यवसाय ठरला आहे. त्यांना गुटखा पुडी विक्रीतून सर्वाधिक नफा होतो.