जलयुक्त शिवार योजना : गावतलावासाठी ग्रामस्थ एकवटलेअंजनगाव सुर्जी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव येथे नवीन गाव तलाव निर्माण करण्याचे शासकीय नियोजन झाले असताना सातेगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गाव तलावाचे काम सुरू व्हावे यासाठी चक्क उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सातेगावात राजकीय खळबळ उडाली आहे. प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे याबाबत बोलले जात आहे.भूगर्भातील जलपातळी वाढविणे व शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील सातेगाव येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आ.रमेश बुंदिले, जि.प. सदस्य जया बुंदिले, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता काळे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेकडून २०१५-१६ या वर्षात २२ लक्ष रुपयांच्या गावतलाव निर्माणाचे शासकीय नियोजन करण्यात आले. प्रशासकीय मान्यतेसह निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु पावसाचे दिवस येऊन ठेपल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नाही. हे सर्वश्रुत असताना सातेगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय हेवे दाव्यापोटी स्थानिक पदाधिकाऱ्यांना बदनामी करण्याच्या व श्रेयाच्या हेतूने पावसाळयानंतर गावतलाव होणारच, हे अधोरेखित झाले असताना गावतलावाचे काम व्हावे, यासाठी चक्क उपोषणाचा इशारा दिला ही बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होताच तालुक्यातील राजकीय नेते विचार करू लागले आहे. आंदोलन निरर्थक असल्याचे सर्वत्र चर्चा होत आहे. या व्यतिरिक्त सातेगावात पालकमंत्री, आमदार व जि.प. सदस्य यांच्या प्रयत्नातून अंतर्गत रस्ते १५ लाख, फाटा ते सातेगाव रस्ता ४० लाख, जलयुक्त शिवार अंतर्गत राजापूर नदीवर दोन बंधारे ७० लक्ष साठवण बंधारा दुरुस्ती ४० लक्ष एवढे कामे केवळ एकाच वर्षात मार्गी लागले आहे. परंतु स्थानिक ग्रामपंचायतीने दीड वर्षाच्या काळात प्रमुख गाव विकासाकडे लक्ष न देता केवळ गटबाजीच्या राजकारणातून राजकीय हेतूने प्रयत्न होत आहेत. याआधी पाच वर्षांच्या कारभारात ग्रामपंचायतीने सतत नावीन्यपूर्णचा विशेष पुरस्कार मिळवून जिल्ह्यात सातेगावचा नावलौकिक मिळविला होता आणि कर वसुलीचे प्रमाण सतत ८० टक्केच्यावर राहिले होते, अशी चर्चादेखील राजकीय वर्तुळात होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
उपोषणाचा इशारा देऊन जनतेची दिशाभूल
By admin | Updated: June 19, 2016 00:02 IST