अचलपूर : मुलाला शाळेत प्रवेश देण्यासाठी पालकाकडून १ हजार १०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली. अमरावतीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी १२.२० वाजता परतवाडा येथे ही कारवाई केली. संतोषकुमार शंकरलाल अग्रवाल (५४, परतवाडा) असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.संतोषकुमार अग्रवाल हे परतवाडा येथील सुंदराबाई बॉईज हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. परतवाडा येथील रहिवासी तुळशीराम धुर्वे हे ९ जुलै रोजी त्यांचा मुलगा जगदेव याचा इयत्ता ७ वीत प्रवेश घेण्यासाठी शाळेत गेले होते. अग्रवाल यांनी तुळशीराम यांच्या मुलाचा शाळेत प्रवेश देण्यासाठी त्यांना २ हजार १०० रुपये व शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र आणण्यास सांगितले. ११ जुलै रोजी तुळशीराम हे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन शाळेत गेले. परंतु अग्रवाल यांनी तुळशीराम यांना २ हजार १०० रुपयांची मागणी केली. अखेर तुळशीराम यांनी अग्रवाल यांना १ हजार १०० रुपये देण्याचे कबूल केले. ही तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात नोंदविली. एसीबीच्या पथकाने सोमवारी परतवाडा येथील सुंदराबाई बॉईज हायस्कूल येथे सापळा रचला. तुळशीराम यांच्याकडून लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने संतोषकुमार अग्रवाल यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: July 14, 2014 23:43 IST