इंदल चव्हाण - अमरावतीओसंडून वाहणाऱ्या येथील वडाळी तलावात पोहण्यासाठी बेधडक तलावाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या घेण्याचा हा प्रकार लहान मुले व तरूणांसाठी केव्हाही जीवघेणा ठरू शकतो. तलावाच्या भिंतीलगत असलेले टाके अरुंद असून मुले २० फूट उंचीवरून यात उलट्या उड्या घेतात. अंदाज चुकल्यास सरळ भिंतीवर पडून यात मृत्यूदेखील ओढवू शकतो. याला आवर घालणे गरजेचे आहे.शहरासाठी मुख्य आकर्षण ठरत असलेले वडाळी गार्डन व तलावावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच परसिरातील तरुण मंडळी पोहण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येते. मात्र, तलावातील गाळाचा भाग असलेल्या भिंतीलगत मुले व तरूण पोहण्यासाठी गर्दी करीत आहेत. भिंतीलगत असलेल्या टाक्यात २० फूट उंचीवरून उड्या मारीत आहेत. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.अमरावतीचे मुख्य पर्यटन स्थळ असलेला वडाळी तलाव सध्या ओव्हरफ्लो झाल्याने भिंतीवरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे तरूणांना पोहण्याचा मोह आवरत नाही. परिणामांची शक्यता ओळखून येथे नेमण्यात आलेले सुरक्षा गार्ड या तरूणांना रोखण्याचा प्रयत्न करतात; मात्र, लहान मुले आणि तरूण गार्डला न जुमानता बिनधास्त पोहत आहेत. सक्ती केल्यास तरूण गार्डच्या अंगावर धावून जात असल्याने वादाचे प्रसंग उदभवतात. शहरातील नागरिकांसाठी सहलीचे प्रमुख ठिकाण असलेल्या वडाळी तलाव परिसराच्या सौंदर्याला आणि ख्यातीला गालबोट लागूू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. संबंधितांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
वडाळी तलावाच्या संरक्षण भिंतीवरून जीवघेण्या उड्या
By admin | Updated: September 17, 2014 23:28 IST