अमरावती : राज्यातील जमिनीच्या पुनर्मोजणीचे काम तीन टप्प्यात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही मोजणी उपग्रह आणि जीपीएससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार असल्यामुळे भविष्यातील जमीन विषयक सर्व तंटे निकाली निघण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यातील काही गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-पुनर्मोजणीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. यापूर्वी हा प्रयोग पुणे जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर आता हा उपक्रम अमरावतीसह सर्वत्र राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ई-पुनर्मोजणीच्या प्रकल्पामध्ये उपग्रहामध्ये सर्वेक्षण, आणि जीपीएस सिस्टिमचा वापर केला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमी अभिलेख विभागाने उपक्रम राबविणे सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला होता. त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या आधारे राज्यातील जमिनीची तीन टप्प्यात मोजणी करण्यात येणार आहे. यापूर्वी ब्रिटिशांच्या काळात जमीन मोजणीचे काम झाले होते. त्यानंतर प्रथमच राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने मोजणीत अचुकता येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यातील जमीनविषयक वाद कमी होण्यास मदत होणार आहे. सर्व गटांना क्रमांक आणि त्यांच्या मालकी हक्काची हमी मिळणार आहे. भविष्यात पुनर्मोजणीची आवश्यक राहणार नाही, असे भूमी अभिलेख विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील जमिनीची पुनर्मोजणी होणार
By admin | Updated: September 10, 2014 23:18 IST