पान १
अमरावती : नागपुरी गेट पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ३ लाख ८८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वाहनचालकासह दोघांना अटक केली. अन्न व औषधी प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झालेत. मात्र, पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी केवळ न केवळ प्यादी आहेत. सूत्रधार वेगळाच आहे. त्यामुळे ठाणेदार पुंडलिक मेश्राम गुटखा तस्करीचे मूळ शोधून सूत्रधार कम तस्कराला अटक करणार का, असे नानाविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राज्यात सन २०१२ पासून गुटखाबंदी असली, तरी प्रत्यक्षात या काळात पुरवठादार ‘मालामाल’ झाले आहेत. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागापर्यंत या पुरवठादारांचे जाळे पसरले आहे. कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, अशी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची नेहमीची हाकाटी. पोलीस गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करतात. पण पुरवठादारांचे जाळे एवढे विस्तारलेले आहे की, कारवाईच्या वेळी फार कमी साठा यंत्रणेच्या हाती लागतो. अमरावती शहरात झालेल्या अनेक सुमार कारवायांमधून ते उघड झाले आहे.
वाहतूक, विक्री करणारी मंडळी अटकेत
ज्याप्रमाणे वरली, मटका, जुगाराच्या कारवाईत ‘भारत’भर बडा मासा अडकत नाही, अगदी त्याच धर्तीवर गुटखा विक्री करणारे, तो माल पोहोचवून देणारे प्यादे पोलिसांच्या हातात लागतात. सूत्रधार, वितरक, पुरवठादार नामानिराळाच राहतो. ते चेहरे पोलीस किंवा एफडीएपासून लपलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई होत नाही.
//////////////
अमरावती मोठे अन् मध्यवर्ती केंद्र
पश्चिम विदर्भात गुटखा उत्पादनात अमरावती मोठे केंद्र बनले आहे. शेजारी राज्यात गुटखा विक्रीला परवानगी असल्याने सीमाभागात गुटखा विक्री बिनदिक्कतपणे सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांच्या पाठबळावर खुलेआम बेकायदेशीरपणे गुटखा उत्पादन सुरू आहे. याठिकाणी उत्पादित गुटखा नजीकच्या कर्नाटकासह कोकण व उत्तर महाराष्ट्रात विक्री केला जातो.
//////////////////
रामपुरी, मसानगंजही आगार, बडनेराकडे डोळेझाक
शहरात गुटखा कारवायांवर नजर रोखली असता, रामपुरी कॅम्प, मसानगंज भागात अनेकदा कारवाई झाली, रेल्वे स्टेशन चौकातील एक दुकान त्यासाठी कुख्यात आहे. त्याच्याविरूद्ध अनेकदा कारवाई झाली. मात्र त्याचा गोरखधंदा बंद झालेला नाही. तर, गुटखा तस्करीचे नेटवर्क बडनेरातील एका विशिष्ट ठिकाणाहून चालविले जात असताना त्याकडे झालेले दुर्लक्ष ‘हप्तेखोरी’चे निदर्शक ठरली आहे.
////////////////////////