तिसऱ्या आठवड्यात तपासणी : पूर्वतयारीला वेगप्रदीप भाकरे अमरावतीमहापालिका हद्दीतील स्वच्छतेसाठी दिल्या जाणाऱ्या दोन हजार गुणांपैकी तब्बल ६०० गुणांचा ‘फैसला’ शहरातील नागरिकांना करावयाचा आहे. शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांनी दिलेल्या उत्तरासह घनकचरा व्यवस्थापन, शौचालयांची स्थिती या मुद्यांवर स्वच्छ शहराचे गुणांकन केले जाईल. १७ ते १९ जानेवारी दरम्यान केंद्र सरकारच्या प्रतिनिधींद्वारे (क्यूसीआय) शहराचे सर्वेक्षण होणार असून महापालिकेने स्वच्छतेसाठी केलेल्या उपाययोजना, प्रत्यक्ष स्थळपाहणी व नागरिकांशी संवाद या तीन टप्प्यांद्वारे गुणांकन केले जाईल. शहरात स्वच्छता आहे की नाही, कचरा घेण्यासाठी घंटागाडी नियमित येते की नाही, आपल्या भागात कचराकुंडी आहे की नाही, अशा प्रश्नांची उत्तरे अमरावतीकर नागरिक कशी देतात, यावर सगळे अवंलबून असेल. मात्र, नागरिकांनी वास्तवातील उत्तरे दिलीत तर मनपाची लक्तरे वेशीवर टांगली जातील. ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत ४ जानेवारीपासून देशभरातील ५०० शहरांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. २००० गुणांच्या यापरीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी जोरकस प्रयत्न चालविले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारणीसह स्वच्छ शहराकडे पालिकेने लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठीच्या पूर्वतयारीने वेग घेतला आहे. ४ फेब्रुवारीपर्यंतच्या या सर्वेक्षणात केंद्राचे स्वच्छता पथक संबंधित शहरात जाऊन वस्तुस्थिती तपासणार आहे. १५ फेब्रुवारीला देशभरातील ५०० शहरांचे स्वच्छता क्रमांक जाहीर होतील. स्वच्छता सर्वेक्षणात तीन टप्प्यात गुणांकन केले जाणार आहे. दोन हजार गुणांपैकी ९०० गुण महापालिकेने शहर स्वच्छतेबाबत केलेल्या सुविधा, वाहतूक, प्रक्रिया, माहितीपत्रके, रेकॉर्डस, फोटोग्राफ्स, जनजागृती व अन्य मुद्यांसाठी असणार आहे. ५०० गुण प्रत्यक्षस्थळ पाहणीसाठी दिले जातील. याअंतर्गत संबंधित तपासणी पथक (क्यूसीआय) शहरातील रस्त्यांवरील कचराकुंड्याची स्थिती, कचरा वाहतुकीची स्थिती, कचरा डेपोची स्थिती, तेथील प्रकल्प, कचरा वाहणाऱ्या वाहनांची स्थिती, कचरा संकलन व सफाई कामगारांना सुविधा, शौचालय, नागरी वसाहत, रेल्वेस्टेशन, डेपो, शाळा, हॉटेल्स, भाजीबाजार, धार्मिक स्थळे आदी मुद्दे विचारात घेणार आहेत. त्यानंतर नागरिकांना सहा प्रश्न विचारून प्राप्त उत्तरातून उर्वरित ६०० गुणांपैकी अंतिम गुणांकन होईल. दोन हजार गुणांतून अमरावतीचे अंतिम गुण व देशातील पाचशे शहरातील अंतिम स्वच्छता क्रमांक ठरणार आहे. त्यासाठी महापालिका ‘स्वच्छता अॅप’वर आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे लक्ष पुरवित आहे. कचराकुंड्या ओव्हरफ्लोशहरातील पाचही प्रशासकीय झोनमधून निघणारा कचरा संकलित करण्यासाठी वर्षाकाठी १२ कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र, शहरातील अनेक कंटेनर ओव्हरफ्लो झालेले दिसतात. घंटागाड्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील बाजारपेठांसह मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये कचरा अस्तव्यस्त पसरलेला असतो.कचरा पेटविण्याचा गोरखधंदाशहरातील अनेक भागात नागरिक आणि कंत्राटदारांच्या कामगारांकडून कचरा पेटविला जातो. त्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. इतवारा बाजारातील प्रकल्प अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. सुकळीमधील प्रकल्प अद्याप अधांतरी आहेत. शहरातील मोकळ्या जागी कचरा अस्तव्यस्त पडलेला असतो. मोकाट जनावरे हा कचरा इतरत्र पसरवून टाकतात.नागरिकांमध्ये जनजागृती सुरू स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचे स्वच्छता सर्वेक्षणात उघड होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वेक्षणासाठी ९ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शहर सर्वाथाने चकाचक करण्याचा चंग पालिका प्रशासनाने बांधला आहे. त्यादृष्टीने स्वच्छता अॅप, तक्रारींची सोडवणूक, वैयक्तिक शौचालयाची उभारणी, कंटेनर याकडे लक्ष पुरविले जात आहे.
‘स्वच्छ अमरावती’चे भविष्य नागरिकांच्या हाती
By admin | Updated: January 9, 2017 00:02 IST