कोरोना योध्याचा सन्मान
धामणगाव रेल्वे : दोन वर्षांपासून आरोग्य यंत्रणेतील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांवर अधिक भार येत आहे. या दोन वर्षांत अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सेवा केली असून, हे त्यांचे कार्य अधिक मोलाचे असल्याचे मत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी व्यक्त केले.
येथील पंचायत समिती सभागृहात डॉक्टर डे निमित्त तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती महादेव समोसे, तर अतिथी म्हणून उपसभापती माधुरी दुधे, जि. प. सदस्य अनिता मेश्राम, पं. स. सदस्य शुभम भोंगे यांची उपस्थिती होती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, डॉ. सचिन देवकर, डॉ. धीरज देशमुख, डॉ. आकाश चौरे, डॉ. कल्पना हेडवे यांचा गौरव करण्यात आला. कोरोनाची पहिली व दुसरी लाट आरोग्य विभागाने मोठ्या शर्थीने व आव्हानाने पेलली. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने अधिक भार या यंत्रणेवर वाढणार आहे. आतापासूनच संयमाने आणि धैर्याने आपली सेवा सुरूच ठेवावी, असेही गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत जोशी, राजेश पवार, सारंग काळे, अमोल गोपने, किशोर चव्हाण, मिलिंद ठुणूकले यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार विशाल सुटे यांनी मानले.