पूर्णानगर : शेतीच्या वहिवाटीच्या रस्त्यामध्ये शीतगृहाचे बांधकाम करण्याकरिता रस्त्यावर खोदकाम करून रस्ता बंद केल्याने त्यामुळे त्या रस्त्यावरील सर्व शेतकरी शेतीची मशागत करण्यास अडचणीत आले होते. याबाबतची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून, महसूल विभागाने या तक्रारीची दखल घेऊन तातडीने आदेश काढून शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण पसरले. शासनाचे कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची मौजा पूर्णानगर व मौजा रस्तमपूर येथे अंदाजे १५० हेक्टर शेती आहे. शेतीची मशागत करण्याकरिता सर्व शेतकऱ्यांना हा पांदण रस्ता एकच आहे. आतापर्यंत सर्व शेतकरी याच रस्त्याने वहिवाट करीत होते. मनोहरलाल भूत व विलास वाघमारे यांच्या धुऱ्यावरून वहिवाटीचा रस्ता आहे. परंतु मनोहरलाल भूत यांचा मुलगा आदित्य भूत यांनी २५ डिसेंबर रोजी जेसीबी मशीनद्वारे रस्त्यावर खोदकाम करून हा रस्ता बंद केला होता. त्यामुळे रस्त्यावरील सर्व शेतकरी मशागत करण्यास अडचणीत आले होते. सध्या हरभरा व तूर या पिकाची मशागत चालू असून, रस्ता बंद केल्याने या दोन पिकाचे नुकसान होत होते. याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे दाखल केली असता, तक्रारीची दखल घेऊन १ जानेवारी रोजी तहसीलदार नीता लबडे, मंडळ अधिकारी डिपटे, तलाठी वाघ यांनी स्थळाची मोका पाहणी करून अंदाजे ४० शेतकऱ्यांचे बयान नोंदविले व जुन्या वहिवाटीच्या रस्त्यावर केलेले खोदकाम तात्काळ बुजवून सदरचा रस्ता शेतकऱ्यांसाठी मोकळा करून देण्यात यावा, याबाबतचे आदेश पारित करून खोदकाम केलेला रस्ता बुजविण्यात आला व वहिवाटीचा रस्ता मोकळा करून दिल्याने शेतकऱ्यांनी भातकुली तहसीलदार नीता लबडे, मंडळ अधिकारी डिपटे, तलाठी वाघ यांचे कौतुक केले आहे.
अखेर शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता तहसीलदारांनी केला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST