एलआयसी हाऊसिंगचा कारभार : धनादेश तीनदा बाऊंसगणेश देशमुख अमरावतीगृहकर्ज मंजूर झाले. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने संबंधित बिल्डरला १५ लक्ष ८५ हजार रुपयांचा धनादेश दिला. त्याभरवशावर कर्जदाराने सेलडीड केली; पण तो धनादेश वटलाच नाही. एकदा नव्हे, चक्क तीनदा! एलआयसी हाऊसिंग फायनान्सने रक्कमच दिली नसल्याने घर खरेदीचा करार वैध मानायचा कसा, असा सवाल बिल्डरने कर्जदाराला केल्यामुळे एकीकडे घर गमावण्याची पाळी कर्जदारावर आली. दुसरीकडे एलआयसी हाऊसिंग फायनान्सने न दिलेल्या कर्जाच्या ईएमआयचीही कपात सुरू केल्याने संबंधित कर्जदार चांगलाच गोत्यात आला. सुधाकर बहालुराम जांघेल यांनी येथील एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून १५ लक्ष ८५ हजार रुपयांचे गृहकर्ज घेतले. १९ जानेवारी २०१६ रोजी ८७४०७२ क्रमांकाचा धनादेश एलआयसी हाऊसिंग फायनान्सने जारी केला. मुंबई फोर्ट येथील शाखेच्या अॅक्सिस बँकेचा हा धनादेश नियमानुसार मुंगसाजी कृपा बिल्डर्सच्या जगदीश पाटील यांना देण्यात आला. त्या धनादेशाच्या आधारे २५ जानेवारीला सेलडीड करण्यात आली. सेलडीडमध्ये धनादेश क्रमांक नोंदविण्यात आला. २७ जानेवारी रोजी बिल्डरने नागपूरच्या बँक आॅफ इंडियाच्या त्रिमूर्तीनगर शाखेत धनादेश जमा केला. २८ जानेवारी रोजी ही रक्कम संबंधित खात्यात जमा झाली. त्याच दिवशी बँकेने ती पुन्हा काढूनही घेतली. धनादेशावर 'बीओआय' ऐवजी 'बीओबी' नोंदविण्यात आल्याने आम्ही रक्कम परत काढून घेतली, असे कारण बँक आॅफ इंडियाच्या त्रिमूर्तीनगर शाखेने दिले. बिल्डरने एलआयसी हाऊसिंग फायनान्सला चूक लक्षात आणून दिल्यावर त्यांनी ३० जानेवारी रोजी बँक आॅफ इंडियाच्या व्यावस्थापकाला पत्र लिहून एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून मुद्रणदोष झाल्याचे स्पष्ट करून सदर धनादेश वटविण्याची विनंती केली. बिल्डरने पुन्हा ३० रोजी त्रिमूर्तीनगर शाखेत धनादेश जमा केला. २ फेब्रुवारी रोजी धनादेश पुन्हा बाऊंस झाला. पहिलेच कारण याहीवेळी देण्यात आले. बिल्डरने पुन्हा एलआयसी हाऊसिंग फायनान्सला सदर बाब कळविली. ६ फेब्रुवारी रोजी एलआयसी हाऊसिंग फायनान्सने धनादेशात दुरुस्ती करून तो बिल्डरला दिला. यावेळी एलआयसी हाऊसिंग फायनान्सने एक सल्लाही दिला. आता बँक आॅफ इंडियाच्या शाखेत धानादेश जमा करण्याऐवजी अॅक्सिस बँकेत खाते काढा. धनादेशाचा हमखास आदर होईल आणि त्याच दिवशी तुमच्या खात्यात रक्कम वळती केली जाईल, असा तो सल्ला होता. ग्राहकाच्या विनंतीनुसार बिल्डरने तेही केले. तथापि, सरद धनादेश यापूर्वी दोनवेळा बाऊंस झाला आहे. त्यामुळे आता तो नाकारण्यात येत असल्याचे कारण देऊन ८ फेब्रुवारी रोजी अॅक्सिस बँकेने तो वटविण्यास नकार दिला. बिल्डरांनी पुन्हा एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे कार्यालय गाठले. चूक अॅक्सिस बँकेची असल्याचे उत्तर दिले.
गृहकर्ज दिलेच नाही ईएमआय वसुली सुरू
By admin | Updated: February 11, 2016 00:22 IST