अकोला : दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या परिसरात अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने, खल्लार पोलिसांना हा मृतदेह शिवणीतील बेपत्ता व्यक्तीचा असावा, असा संशय आल्याने, त्यांनी या बेपत्ता व्यक्तीचे नातेवाईक, पत्नीची चौकशी केली. यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख तर पटली नाही; परंतु शिवणीतील अनैतिक संबंधातून घडलेले हत्याकांड मात्र उघडकीस आले. खल्लार पोलिसांना एक अनोळखी मृतदेह मिळून आला. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला. दरम्यान त्यांना माहिती मिळाली की, शिवणीमधील एक व्यक्ती काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याचा तर हा मृतदेह नसावा. म्हणून खल्लार पोलिसांची चमू शिवणी गावात पोहोचली. बेपत्ता जयकृष्ण सुखदेव गवई याची पत्नी केशरबाई, साळभाऊ लक्ष्मण दादाराव आठवले व इतर काही लोकांची चौकशी केली आणि त्यांना खल्लार पोलिस ठाण्यात नेले. आरोपींना, आपले बिंग फुटले की काय, असे वाटले. त्यामुळे आरोपी लक्ष्मण आठवले याने आपले आकडसासू केशरबाई गवई हिच्यासोबत अनैतिक संबंध आहेत; परंतु साळभाऊ जयकृष्ण हा अनैतिक संबंधाच्या आड येत असल्याने त्याला दादू पांडे व अमोल इंगळे या सहकार्यांच्या मदतीने ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या माहितीने पोलिसही चक्रावून गेले. आपण प्रयत्न केला अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचा आणि घटना उघडकीस आली हत्याकांडाची. त्यामुळे खल्लार पोलिसांनी शनिवारी सिव्हिल लाईन पोलिसांना आरोपींची माहिती दिली आणि उशिरा रात्री चारही आरोपींना सिव्हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हय़ात वापरलेली मोटारसायकल दादु पांडे याच्याकडून रविवारी जप्त केली.
** कवटी एकीकडे अन् धड दुसरीकडे
आरोपींनी चोहोट्टा बाजारलगतच्या शेतशिवारामध्ये जयकृष्णच्या डोक्यावर काठीने प्रहार केले; परंतु तो मरण पावला नाही. त्यानंतर आरोपींनी त्याला मोटारसायकलवर रात्री दहीहांडा परिसरातील शेतशिवारामध्ये आणले. या ठिकाणी त्याला गळफास दिला. तो मरण पावल्याचे लक्षात येताच, आरोपींनी नांगरणी केलेल्या शेतामध्ये त्याचा मृतदेह पुरला आणि निघून गेले; परंतु शेतात पेरणी केल्यानंतर आपले बिंग फुटेल या भीतीने आरोपींनी आठ दिवसांनी या शेतामध्ये जाऊन पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि पोत्यात भरला. परंतु अंधारामध्ये आरोपींना मृतक लक्ष्मणची कवटी दिसली नाही. त्यांनी त्याचा हाडा मांसाचा सांगडा पोत्यात भरून तो दहीहांडा परिसरातीलच पूर्णा नदीच्या जवळपास असलेल्या नाल्यालगत पुरला. परंतु पोलिसांनी शेतातून जयकृष्णची कवटी जप्त केली.