अमरावती : जिल्ह्यात ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे. सद्यस्थितीत ४ हजार १२६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. सर्वाधिक १ हजार ४५८ मेट्रिक टन संयुक्त खते व सर्वात कमी १६० मे टन साठा युरिया खताचा आहे. पिकाला पाण्याची आवश्यकता असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारली आहे. पावसाळ्याचे १२० दिवसांपैकी १०५ दिवस आटोपले आहे. आता परतीच्या पाऊसाचा प्रवास सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. यामुळे पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच पिकांची वाढ खुंटली आहे. अशा स्थितीत पिकांना रासायनिक खतांची गरज आहे. मात्र पाऊस नसताना खताचा डोज दिल्यास पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे शेतकरी खताची मात्रा देण्यास धजावत नाही. परिणामी खतांची मागणी मंदावल्याने जिल्ह्यात तूर्तास एमओपी, कॅन, अमोनियम सल्फेट वगळता उर्वरित खतांचा साठा शिल्लक आहे. यावर्षी जिल्ह्यात १ लाख १५ हजार ६०० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी मंजूर होऊन सप्टेंबर अखेरपर्यंत तेवढा साठ्याचे नियोजन करण्यात आले. १४ सप्टेंबरपर्यंत ९२ हजार ९४८ मेट्रिक टन खतांचा प्राथमिक पुरवठा करण्यात आला. सद्यस्थितीत ७ हजार ९३८ मे टन खतांचा नॉन बफर साठा शिल्लक आहे. ३१ मार्च २०१५ अखेर रबीमधील खतांचा ७ हजार २२७ मेट्रिक टन साठा अधिकृत विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. असा एकूण १ लाख ८ हजार ११३ मे. टन साठा आतापर्यंत उपलब्ध होता. यापैकी १ लाख ३ हजार ९८७ मे. टन खतांच्या साठ्याची विक्री झाल्याने जिल्ह्यात ४ हजार १२५ मेट्रिक टन साठा विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. (प्रतिनिधी)
पावसाअभावी रासायनिक खतांची मागणी मंदावली
By admin | Updated: September 16, 2015 00:17 IST