लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन उत्पादन करणारा शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. आता खुल्या बाजारात कापसाचे दर पडल्याने पेरणीपासून वेचणीला लागलेला खर्च निघणार कसा, या चिंतेने कापूसउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. खासगी बाजारात कापसाला प्रतिक्विंटल केवळ ५२०० रुपये भाव मिळत आहे. यावर्षी कापसाचे भाव वाढतील, या अंदाजाने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला, तर गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने कापसाची विक्री सुरू केली आहे. चांदूर बाजार तालुका हा दर्जेदार कापसासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस लांब धाग्याचा आहे. गतवर्षी सोयाबीनने दगा दिल्याने यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, यावर्षी सर्वच पिकांवर सुरुवातीलाच निरनिराळे रोग आले. कपाशी पिकावरसुद्धा रोगाचे सावट आले होते. यामुळे पेरणीपासून तर कापूस वेचणीपर्यंत शेतकऱ्यांना अवाढव्य खर्च आला आहे. तथापि, दर ५ हजार २५० रुपयांवर स्थिर असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. वर्षभराचा उदीम ज्या पिकाच्या भरवशावर, त्यात फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी हवालदील आहेत.
अर्थकारण बिघडलेकपाशीला कमाल ५, ३२५ रुपये, तर किमान ५ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी चार ते पाच वर्षे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला. परंतु, पिकाला योग्य दर मिळत नव्हता. म्हणून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड वाढविली. गतवर्षी ५ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिकचा भाव कपाशीला मिळाला. नंतर हे दर ६ हजार ५०० रुपयापर्यंत पोहोचले. मात्र, आता बाजारपेठेत कापसाचे भाव पडले आहेत. यावर्षी कापूस वेचणीसाठीसुद्धा मजुरांचे दर वाढल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन कमी व खर्च अधिक करावा लागला. सबब, शेतीचे अर्थकारणच बिघडले.