बँक वर्धापन दिन
शिक्षणाचा उचलला खर्च
एसबीआय कृषी बँकेचा उपक्रम
फोटो पी ०६ धामणगाव
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेतकरी कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला. त्यांच्या पाल्याचे आबाळ होऊ नये, त्याला शिक्षण घेता यावे, म्हणून भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखेच्या शाखा व्यवस्थापकांनी आदर्श उपक्रम राबवित बँकेच्या ६६ व्या वर्धापनदिनी त्या पाल्याला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
धामणगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची बँक म्हणून भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा ओळखली जाते. येथील शाखा व्यवस्थापक विनायक कुराडे यांनी बळीराजाच्या लाभाच्या विविध योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाकाळात सर्वाधिक धामणगाव तालुक्यात ६० लोकांचा मृत्यू झाला. यात युवा शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. तिवरा येथील किशोर भीमराव चौधरी या ४१ वर्षीय शेतकऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यामागे दोन चिमुकले आहेत. येथे शाखा व्यवस्थापक विनायक कुराडे यांनी या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभे राहण्यासाठी बँकेच्या वर्धापनदिनी त्या दोन्ही चिमुकल्यांचा एक वर्षाचा शैक्षणिक खर्च बँकेमार्फत उचलला. बँकेच्या वर्धापनदिनी मृत शेतकऱ्याची पत्नी प्रतीक्षा किशोर चौधरी यांना निमंत्रित करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च बँक करीत असल्याचे सांगितले. यावेळी राजेश चांडक, शाखा व्यवस्थापक विनायक कुराडे, क्षेत्र अधिकारी सीमा काटकर, मुरलीधर कडू, राजेंद्र धनस्कर, रोशनी शहा, अर्पित राक्षसकर, विजू शहा, पुंडलिक कुंभरे, महेश लक्षणे, संजय दहातोंडे, चैताली खंदारे, दीक्षा राठी, कांचन कार्लेकर यांची उपस्थिती होती.