अमरावती : स्थानिक विलासनगर येथील विकास विद्यालयाच्या महात्मा फुले वसतिगृहात विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखविल्याची उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी पोलिसात दाखल केलेली तक्रार खोटी असून विद्यार्थ्यांचा बोगस प्रवेश उपशिक्षणआधिकाऱ्यांनी सिद्ध करावा अन्यथा संस्थेकडून त्यांच्याविरूध्द पोलिसात तक्रार दाखल करण्यात येईल, असे विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय अडसोड यांनी सांगितले. गुरुवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शाळेतील निर्धारित पटसंख्येचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विकास विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेत १३ विद्यार्थांचा बोगस प्रवेश दाखविल्याचा आरोप उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रारीत केला. याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. याप्रकरणाचा खुलासा करण्यासाठी मुख्याध्यापक अडसोड यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उपशिक्षणाधिकाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले. विकास विद्यालयाची स्थापना १९६९ साली झाली आहे. या विद्यालयातून अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत. सध्या शिक्षणक्षेत्रात स्पर्धा सुरु आहे. शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत. महापालिकेअंतर्गत ८० शाळांची आवश्यकता असताना येथे ११० शाळा आहेत. यामध्येही विकास विद्यालयाची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे शाळेचा चांगला निकाल पाहून इतर काही शाळांकडून विकास विद्यालयाला बदनाम करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोेपही अडसोड यांनी केला. या शाळेत सन २०१० ते २०११ मध्ये विद्यार्थ्यांचे मूळ दाखले पाहून शासन नियमानुसार शाळेत प्रवेश देण्यात आला होता. बनावट दाखल्यांच्या आधारावर विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात आलेला नाही. विकास विद्यालयातील डमी विद्यार्थ्यांची चौकशी करावी, अशी तक्रार रामराव शेंडे यांनी लोकशाही दिनात दाखल केली. चौकशी उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे याच्याकडे होती. तीन वेळा चौकशी झाल्यानंतर विकास विद्यालयाविरोधात दाखल तक्रारीचे समाधान झाल्यामुळे शेंडे यांनी ही तक्रार मागे घेतली. हे प्रकरण नस्तीबंद करण्यात आल्यानंतरही राजगुरे यांच्याकडून मानसिक त्रास देणे सुरुच आहे, असेही त्यांनी सांगितले.
- तर उपशिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार करणार
By admin | Updated: August 28, 2014 23:28 IST