अमरावती : गावपातळीवर ‘मनरेगा’तून रोजगारनिर्मितीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी विविध योजनांचा मेळ व गावातील अंगणवाडी, शाळा, पाणलोट क्षेत्र आदींचा विकास याद्वारे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही योजना उपयुक्त ठरेल. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न व व्यापक नियोजन करण्याचे निर्देश रोहयोचे राज्याचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी शुक्रवारी येथे दिले.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक घेण्याबाबत निर्देश दिले होते. ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या उपक्रमाच्या पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यात नियोजन व अंमलबजावणी होत आहे. त्यानुषंगाने आज अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त धनंजय गोगटे, श्याम मक्रमपुरे, उपजिल्हाधिकारी राम लंके, प्रवीण सिनारे व प्रशांत थोरात यांच्यासह ग्रामविकास, शिक्षण, महिला व बालविकास, महसूल, मृद व जलसंधारण, रोहयो आदी विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोना संकटकाळात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगातून अनेक विकासकामे राबविण्यात आली. मात्र, आता पारंपरिक कामे व रोजगारनिर्मितीपुरताच हेतू न ठेवता त्याद्वारे ग्रामीण जीवनात समृद्धी आणण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांचा मेळ घालून त्याच्या उत्पन्नात भर घालता येणे शक्य आहे. गावासाठी भौतिक सुविधांची निर्मितीही करता येणे शक्य आहे. त्यासाठी व्यापक नियोजन आवश्यक आहे. कामांचे नियोजन करताना ज्या गोष्टींचा शेतकरी बांधवांना फायदा होईल, अशी कामे हाती घ्यावीत. शेतकरीहिताची कामे राबवताना त्यांचे महत्त्वही शेतकऱ्यांना पटवून देण्याची व लोकसहभाग मिळविण्याची क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेची जबाबदारी आहे. अशा कामासाठी नियोजित निधीचा विनियोग सार्वजनिक हितासाठी करता येईल. विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून माहिती तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण अधिक प्रभावीपणे देता येईल. लोकसहभाग मिळविण्यासाठी अशा संकल्पनांचाही नियोजनात समावेश करावा, अशा सूचना नंदकुमार यांनी दिल्या.
बॉक्स
गावाच्या समुध्दीसाठी नियोजन
शेतकरी बांधवांच्या बांधावर वृक्षलागवड, फळबाग लागवड, सिंचन विहीर, गुरांचे गोठे, जलसंधारण अशी विकासकामे राबवून त्यांची आर्थिक उन्नतीकडे वाटचाल होण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करावे. उपलब्ध बाजारपेठेनुसार उत्पादनाचे नियोजन, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा चर्चासत्र, प्रशिक्षण आदी माध्यमातून पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या वैयक्तिक समृद्धीसह गावाची समृद्धी साधण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येणार आहे.