पान ३ ची लिड
अचलपूरच्या शेतकऱ्याचे कोट्यवधीचे नुकसान : कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांची तक्रार
परतवाडा : कंपनीकडून मिळविलेल्या केळीच्या टिशू कल्चर रोपांची शेतात वाढच झाली नाही. यामुळे अचलपूर शहरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांनी रोपे पुरविणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाकडे तक्रार केली असून कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अचलपूर शहरातील मौजा भांडेभोडे व मौजा रायपूर शेतशिवारात शेती असलेल्या शेतकरी श्रीकांत झोडपे, राजू काशीकर, प्रेमचंद दंते, निवृत्ती नाडगे, राजा खडगे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी औरंगाबादच्या एका कंपनीकडून केळीची टिशू कल्चर रोपे मागविली. १५ रुपये प्रतिझाडाप्रमाणे संपूर्ण पैसे कंपनीच्या खात्यात शेतकऱ्यांनी जमा केले. दरम्यान, कंपनीने वेळेवर रोपे पुरविली नाहीत. रोपांची मागणी केली असता शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली. कोरोनाचे निमित्त पुढे केले. नंतर एक ते दीड महिन्यानंतर जवळपास सप्टेंबर २०२० मध्ये कंपनीने एका गाडीतून या पाच शेतकऱ्यांकडे केळीची टिशू कल्चर रोपे पाठविली.
त्या रोपांची शेतकऱ्यांनी लागवड केली, पण या रोपांची अपेक्षेप्रमाणे निर्धारित वाढ झालीच नाही. वाढ खुंटलेल्या या केळीच्या रोपांना तलवारीसारखी पाने यायला लागलीत. यातच ही रोपे रोगग्रस्त, दूषित व निकृष्ट दर्जाची ठरली.
आपली कंपनीकडून फसवणूक झाल्याचे बघून शेतकऱ्यांनी अचलपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, पीकेव्हीचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ राजू धावडे, कंपनी प्रतिनिधी कविश डोंगरे यांच्यासह तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी २० जानेवारी रोजी शेतात जाऊन केळी पिकाची, रोपांची पाहणी केली. प्राथमिक चौकशीत ही केळीची रोपे, झाडे रोगग्रस्त आढळून आली.
या केळीच्या झाडांवर कुकंबर मोज्याक व्हायरस सीएमव्हीचा प्रादुर्भाव आढळून आला. याच रोगाने जळगाव, रावेरकडील केळी पिकांचे यापूर्वी नुकसान केले आहे. वेलवर्गीय काकडीच्या पिकावर हा व्हायरस आढळून येतो. दरम्यान, तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या या पाहणीनंतर आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ. माने या केळी पिकाची पाहणी करणार आहेत.
कोट........................
केळीच्या टिशू कल्चर रोपांबाबत शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान प्राथमिक चौकशीत ही रोपे रोगग्रस्त आढळून आली आहेत. कुकुंबर मोज्याक व्हायरस ‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव त्यावर आढळून आला आहे.
- प्रफुल्ल सातव
तालुका कृषी अधिकारी, अचलपूर.
——————-