अमरावती : जिल्ह्यात २० जून रोजी पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने ८ दिवस खंड दिला. पुन्हा २८ जूनपासून पाऊस सुरु झाला. यंदा खरिपाच्या पेरणीसाठी किमान ९० मि.मी.पाऊस आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५१.३ मि.मी. व १०३.६ टक्के पाऊस पडला. हा पेरणीयोग्य पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.जिल्ह्यात १ ते ३० जून दरम्यान १४६ मि.मी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात गुरूवारपर्यंत १५१.३ मि.मी पाऊस पडला. यामध्ये चांदूररेल्वे, धामणगाव, तिवसा, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व धारणी तालुक्यात पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे या तालुक्यात पेरणीचा जोर वाढला आहे.अद्याप अमरावती, भातकुली, नांदगाव, मोर्शी, वरूड व चिखलदरा तालुक्यात पावसाची टक्केवारी कमी असली तरी चिखलदरा वगळता या तालुक्यांत ८० ते ९० मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे तेथे खरिपाची पेरणी करण्यास हरकत नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुडे यांनी सांगितले.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी २४ हजार १०८ हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी झाली आहे. परेणीची ही टक्केवारी ३३.५ इतकी आहे. जिल्ह्यात यंदा धानासाठी ४ हजार ३६५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ३ हजार ७४५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ज्वारीसाठी ३८ हजार ६७६ हेक्टर पेरणीक्षेत्र असताना ९ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. मका ५७९ हेक्टर, तूर ४५ हजार हेक्टर, मूग ८ हजार १९२ हेक्टर, उडिद ६ हजार २९० हेक्टर, सोयाबीन ९० हजार हेक्टर तर कपाशीची ८० हजार १८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. खरिपाच्या पेरणीचा वेग वाढला असून जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गुरुवारी तालुका मुख्यालयी १८.६ मिमी तर ग्रामीण भागात २५ मिमी पाऊस पडला. अमरावती शहरात १२.८ मिमी इतका पाऊस झाला. (प्रतिनिधी)
कपाशी ४१ टक्के तर सोयाबिनची २८ टक्के पेरणीजिल्ह्यात यंदाच्या हंगामात कपाशीसाठी १ लाख ९३ हजार २६१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ८० हजार १८९ हेक्टर क्षेत्रात ३० जूनपर्यंत पेरणी झाली आहे. ही ४१.४९ टक्केवारी आहे. सोयाबिनसाठी ३ लाख २३ हजर ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ९० हजार ४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. पेरणीक्षेत्राची ही टक्केवारी २७.८५ इतकी आहे.पाऊस-पेरणीत अमरावती, भातकुली माघारलेजिल्ह्यात ३० जूनपर्यंत १४६ मि.मी. पाऊस आवश्यक असताना सरासरी १५१.३ मि.मी. पाऊस पडला. परंतु अमरावती तालुक्यात ७२ टक्के व भातकुली तालुक्यात ७१ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात ३३.५ टक्के पेरणी झाली असताना भातकुलीमध्ये ३.५५ टक्के व अमरावतीमध्ये ५.६१ टक्के इतकी म्हणजे सर्वात कमी पेरणी झाली आहे. हे दोन्ही तालुके पाऊस व पेरणीमध्ये माघारले आहेत.यंदा खरिपाच्या पेरणीसाठी सरासरी ९० मि.मी. पावसाची आवश्यकता आहे. सर्वच तालुक्यांत पुरेसा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करण्यास हरकत नाही- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीधामणगाव आघाडीवरजिल्ह्यात सार्वत्रिक ३३.५ टक्के पेरणी झाली असली तरी सर्वाधिक ५९ टक्के पेरणी धामणगाव तालुक्यात झालेली आहे. अंजनगाव ५७.३, अचलपूर ३३.४, चांदूरबाजार ३५.२, चांदूररेल्वे ३३.७, तिवसा ४५.१, मोर्शी २३, वरुड ३१.८, धारणी ३०.९, चिखलदरा २६.३, अमरावती ५.६१, भातकुली ३.५५ टक्के पेरणी झाली आहे. पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे शेतकरी सुखावला आहे. तिवसा तालुका चिंबयंदा १ ते ३० जून दरम्यान जिल्ह्यात १५१.३ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २३५.८ मि.मी. पाऊस तिवसा तालुक्यात पडला. अमरावती ९७.६, भातकुली १०५.४, नांदगाव १३४.४, चांदूररेल्वे १९२.५, धामणगाव १५५, मोर्शी ११५.१, वरुड १२७.९, अचलपूर १४२.१, चांदूर बाजार १३९.९, दर्यापूर २११.१, वरुड, अंजनगाव १७४.८, धारणी १७३.६ व चिखलदरा तालुक्यात ११२.२ मि.मी.पाऊस पडला आहे.