पालकमंत्र्यांचा निर्धार : रस्ते होणार स्मार्ट, मुक्तागिरीचा सर्वंकष विकासअमरावती : पाच वर्षांनंतर अमरावती हे राज्यातील आगळे उन्नत शहर असेल, असा विश्वास अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी व्यक्त केला. सुंदर, स्वच्छ, रोजगाराच्या भरपूर संधी असलेले आपले देखणे शहर असावे, असे स्वप्न मी बघितले आहे. विशेष म्हणजे अशा जिल्हा मुख्यालयाच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबलेल्या असतील. स्वप्नातील अशी नगरी पूर्णत्त्वास येण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही ना. पोटे यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्रीपदी मी पहिल्यांदाच विराजमान झालो असलो तरी माझा अनुभव नवीन नाही. उलटपक्षी शहर निर्मितीच्या कार्यात माझे 'स्पेशलायझेयन' आहे, असे सूचक उत्तर त्यांनी दिशाभूल करू पाहणाऱ्या यंत्रणेला इशारा देताना दिले. योगायोगाने माझ्या महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग आहे. कुठल्या कामासाठी किमान खर्च किती लागेल, याची अभ्यासू माहिती मला त्यांच्याकडून मिळते. त्याचा मला योग्य वापर करता येईल, असेही ना. पोटे म्हणाले. डीपीडीसीच्या माध्यमातून यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधीची तरतूद नव्हती. सदर संस्थांनाही आता डीपीडीसीतून निधी दिला जाईल, असा निर्णय त्यांनी जाहीर केला. नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेशनुकताच आलेला पाऊस कुठे लाभदायक तर कुठे नुकसानकारक ठरला. कापसाची जी बोंडे फुटली त्यांच्यासाठी अपायकारक तर जी बोंडे फुटायची आहे त्यांच्यासाठी उपायकारक अशी स्थिती कपाशीची आहे. तुरीबाबतही चित्र हेच आहे. संत्र्यांच्या अंबिया बहराचे काही भागात नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या भागात पिकांच्या अवस्थेनुसार पावसाचा परिणाम जाणवला. प्रशासनाला तसा अचूक माहिती असलेला अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, निर्णय घेतला जाईल. ं'स्मार्ट सिटी'स्मार्ट सिटीच्या यादीत अमरावती शहराचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत शहर विकसित करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांमध्ये शहर बसायला हवे. त्यादृष्टीने आढावा सुरू आहे. नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्यावर मात कशी करता येईल यावर भर दिला जात आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. सूचनांचे स्वागत, सर्वमिळून विकास!अमरावतीचा विकास करताना सर्वच घटकांतील लोकांच्या उपयोगी सूचनांचे स्वागत केले जाईल. व्यापारी, पत्रकार, बुद्धीवंत, तंत्रज्ञ, नोकरदार, विद्यार्थी, महिला, सामान्यजन आणि सर्वपक्षीय आमदारांचे योगदान या विकासासाठी लाभणार आहे. सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असे आवाहन ना. पोटे यांनी केले. मुक्तागिरीचा विकासजैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्तागिरी येथे वर्षाकाठी दीड ते पाऊणेदोन लक्ष भक्त आणि पर्यटक भेट देतात. या तीर्थस्थानाकडे मध्यप्रदेशातून येणारा रस्ता गुळगुळीत अणि महाराष्ट्रातून जाणारा रस्ता खस्ताहाल आहे. या रस्त्याचे नवीन बांधकाम केले जाईल. पंजाब, दिल्ली यासारख्या भागांतूनही पर्यटकांना खेचणाऱ्या या नयनरम्य तिर्थस्थानाचा सर्वंकष विकास केला जाईल. पर्यटकांना अधिकाधिकरित्या आकर्षित करणारे ते पर्यटनस्थळ व्हावे, असा मानस असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
अमरावतीला पाच वर्षांत आगळी ओळख!
By admin | Updated: January 4, 2015 23:01 IST