अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी २८ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वीचा असेल. त्याबाबतीत उमेदवारी अर्जासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याचे ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, निवडून आल्यापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करेल, असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबरला जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याबाबत सर्व संबंधित निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारांना याची माहिती देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.