अमरावती : कोरोना काळात महापालिका क्षेत्रासह जिल्हा ग्रामीणमध्ये चिकनगुनिया आजाराचे २३ व मलेरियाच्या १० रुग्णांची नोंद झालेली आहे. शहरातील आऊटस्कड भागात स्वच्छतेची वाट लागल्याने डासांची उत्पत्ती अन् अच्छाद वाढला आहे. आरोग्य व स्वच्छता यंत्रणेच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे दिवसानगणिक रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे.
जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रात १४ व ग्रामिणमध्ये ९ चिकगुनिया रुग्णांची नोंद झालेली आहे. डेंग्यूसारखाच असला तरी चिकणगुणीयाचा आजार अनेक दिवस कायम राहतो. हा ताप बरा झाल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम नंतरही होत असल्याने रुग्ण जेरीस आले आहेत. जिल्हाभरात डेंग्यूचे २२४, तर मलेरियाचे १० रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. हे सर्व आजार डासांपासून होत असल्याने नागरिकांनी घराच्या आसपास डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. महापालिका क्षेत्रात स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. बेपर्वा कर्मचारी अन् कंत्राटदार यांच्यावर कुणाचाही अंकूश नसल्याने कुठलीही कारवाई होण्याची त्यांना भीती नाही, परिणामी दिवसेंदिवस यंत्रणा बेपर्वा होत आहे व याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे.
ईडिस इजिप्ताय हे डास चिकणगुनियाच्या विषाणुचे मुख्य वाहक आहेत. यासोबतच ईडीस अल्बोपिक्टस डासदेखील या विषाणुंचे वाहक असल्याचेही आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे या आजाराचे मूळ कारण असणाऱ्या डासांची उत्पत्तीच रोखणे महत्त्वाचे आहे. मात्र, स्वच्छता यंत्रणांच्या बेपर्वाने यामध्ये वाढ होत असल्याची शोकांतिका आहे.
बॉक्स
तीव्र सांधेदुखी प्रमुख लक्षण
या रोगाची लागण होताच थंडी वाजून ताप येणे, उलटी होणे, अन्नावरची इच्छा कमी होणे, डोके दुखणे यापैकी कोणतेही एक लक्षण या आजारात ठळकपणे दिसून येतात. काहीवेळा अंगावर पुरळदेखील येतात. सांधेदुखीमुळे रुग्णाला फार चालताना त्रास होतो. रक्ताची चाचणी करून चिकनगुनियाचे निदान केले जाते. याशिवाय अन्य चाचण्या करूनही या आहाराचे निदान केले जातात. काही रुग्ण आठवडाभरात बरे होतात. काही रुग्णांना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या
डासांपासून बचाव करणे हा या रोगाचा मुख्य उपाय आहे. चिकणगुनिया पसरवणारे डास हे प्रामुख्याने सकाळी व दुपारच्या वेळी फिरतात, त्या काळात शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. घराचा परिसर स्वच्छ ठेवून कुठेही डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी. आजार औषधांसह अंगभूत रोगप्रतिकारशक्तीमुळे बरा होतो. यासाठी पुरेशी विश्रांती, द्रवरुप आहार व वेदनाशामक औषधी घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो.
बॉक्स
तापाच्या आजारात लक्षणे समान
तापांमुळे होणाऱ्या आजारांत जवळपास अनेक लक्षणे सारखीच आहे. मलेरियात थंडी वाजून ताप येणे, राहून राहून ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी होणे, पोटदुखी, हागवण, अतिसार, अंगदुखी, शरीरात वेदना होणे, सांध्यामध्ये वेदना होणे, नाडीची गती जलद होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. रुग्णांची तपासणी करून यकृत व लिव्हरचा आकार वाढला आहे का, याची तपासणी केली जाते व रक्ताची चाचणी करून निदान केले जाते.