मृगबहराची फूट नाही : पावसाअभावी ५० हजार हेक्टरवरील संत्राबागांचे नुकसानगजानन मोहोड - अमरावतीविदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रख्यात वरूड, मोर्शीसह जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक क्षेत्रातील संत्राबागांमध्ये मृगबहर फुटलाच नाही. मृगबहरासाठी आवश्यक नैसर्गिक वातावरण, आर्द्रता व भरपूर पाऊस यावर्षी नाही. अल्प प्रमाणातील आंबिया बहाराची फळे देखील सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे गळू लागली आहेत. जिल्ह्यातील ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारावर विसंबवून असतो. मात्र, दीड महिन्यांपासून खंडित पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे किमान २ हजार कोटींचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. यापैकी ४५ टक्के क्षेत्र मोर्शी व वरूड तालुक्यातील आहे. यांसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखील सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारालाच प्राधान्य देतात. जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांची भिस्त मृगबहरावरच!संत्राला आंबिया बहर साधारणत: जानेवारी महिन्यात फुटतो. परंतु जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांजवळ मुबलक पाण्याची सोय आहे, ते आंबिया बहर घेतात. इतर ६० ते ७० टक्के शेतकरी पाण्याअभावी मृगबहारावर विसंबून असतात. यासाठी झाडाला दोन महिने ताण दिला जातो. परिणामी झाडे छोट्या फांद्यामध्ये अन्नद्रव्ये साठवितात. जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यावर आर्द्रता निर्माण होते. याचवेळी साठवलेली अन्नद्रव्ये मृगबहाराच्या प्रक्रियेत फुटून येतात. किंवा झाडाला नवीन पाने येतात. दुर्दैवाने यावर्षी मृगबहरासाठी प्रतिकूल स्थिती असल्याने संत्रा उत्पादक अडचणीत आले आहेत. असे झाले संत्रा उत्पादकांचे नुकसान जिल्ह्यात ८० हजार हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. यापैकी ५० हजार हेक्टर क्षेत्रात मृगबहर घेतला जातोे. एका हेक्टरमध्ये सर्वसाधारण ३०० झाडे असतात. यामध्ये ८ ते १० टन संत्रा उत्पादन घेतल्या जाते. तूर्तास संत्राचा भाव हजार फळांना दोन हजार रूपये आहे. या स्थितीत १६ ते २० हजार रूपये टन या अंदाजात एका हेक्टरमध्ये दीड ते दोन लाखांचे उत्पन्न संत्रा उत्पादकाला व्हायला हवे. जिल्ह्यातील मृगबहराची एकूण अवस्था बघता संत्रा उत्पादकांचे अंदाजे २ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.
संत्रा उत्पादकांना २ हजार कोटींचा फटका
By admin | Updated: July 10, 2014 23:19 IST