अमरावती : वित्तीय वर्ष संपल्याच्या सहा महिन्यांच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे सहकारी संस्थांना बंधनकारक असताना, कोरोना संसर्गामुळे त्या घेता आलेल्या नाहीत. यावर आता शासनाने पर्याय काढला आहे. ५० पेक्षा कमी सदस्यसंख्या असणाऱ्या संस्थांना सदस्यांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे आमसभा घेता येणार आहे. याशिवाय उर्वरित संस्थांना व्हीसीद्वारेच आमसभा घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात १,९३५ सहकारी संस्थांना आता ही प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
शासनाने २८ जानेवारीच्या पत्रान्वये वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास बँकिंग संस्थांना ३१ मार्चपर्यत मुदतवाढ दिली होती. मात्र, कोरोना संसर्ग काळात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या आमसभा कशा होणार, अशा प्रश्न निर्माण झाला होता. सोमवारी शासनाने यावर व्हीसी किंवा ओएव्हीएमचा पर्याय काढला आहे. यासाठी संस्थेच्या प्रत्येक सभासदास आमसभेचा दिनांक, वेळ आणी ठिकाण याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस, मेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवावी लागेल. याशिवाय संसथेचे कार्यालय व शाखा कार्यालयांच्या ठिकाणीदेखील नोटीस लावावी लागेल. याशिवाय संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेता, याविषयीच्या संपूर्ण माहितीसही वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागणार आहे. व्हीसी सभेकरिता सहकारी संस्थेकडे असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने तज्ज्ञ व्यक्ती किंवा एजन्सीची निवड करुन त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज करावे लागणार आहे.
बॉक्स
अशी आहे आमसभेची तरतूद
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलममध्ये प्रत्येक संस्था वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून चार महिन्यांच्या कालावधीत लेखापरीक्षण पूर्ण करावे लागते व संस्थेचे कामकाज चालविण्यासाठी वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत संस्थांद्वारे सदस्यांच्या विधिमंडळाची वार्षिक बैठक बोलावतील, अशी तरतूद आहे.
बॉक्स
या संस्थांनाच सदस्य सहभागाची परवानगी
शासननिर्देशानुसार कोरोना संसर्गामुळे ५० पेक्षा कमी सदस्यसंख्या असणाऱ्या सहकारी संस्थांनाच सदस्यांच्या सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण घेण्याची परवानगी आहे. मात्र, आता यापेक्षा जास्त सदस्यसंख्या असणाऱ्या सहकारी संस्थांना व्हीसीद्वारे आमसभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठीचे निकष सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
बाॅक्स
तालुकानिहाय सहकारी संस्था
अमरावती तालुक्यात ७४३, भातकुली ६७, नांदगाव खंडेश्वर ७३, चांदूर रेल्वे ६२,धामणगाव रेल्वे ७२, तिवसा १०८, वरूड ११२, मोर्शी ११२, अंजनगाव सुर्जी १३०, दर्यापूर १५६, अचलपूर १०३, धारणी ३७ व चिखलदरा तालुक्यात ३३ सहकारी संस्था आहेत. याशिवाय १२६ ..................... पद्म संस्था अशा एकूण २,०६१ सहकारी संस्था आहेत.