अकाेला : रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेमीनपुरा परिसरातून एका वाहनात कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करत असताना रामदास पेठ पाेलिसांनी हे वाहन शनिवारी पहाटे पकडले. या वाहनातील सहा गुरांना जीवनदान देण्यात आले असून, ते गाैरक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहे, तर पाेलिसांनी वाहनासह गुरे, असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोमीनपुरा परिसरातून एमएच-३० बीडी-२६२४ क्रमांकाच्या वाहनातून गुरांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती रामदास पेठ पाेलिसांना मिळाली. या माहितीवरून पाेलिसांनी माेमीनपुरा येथे नाकाबंदी केली असता हे वाहन पकडले. पाेलिसांना पाहून वाहनचालक व त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी रामदास पेठ पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहा गुरांना जीवनदान देण्यात आले असून, ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आराेपी फरार झाले असून, पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत. ही कारवाई ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत इंगळे, शेख हसन, किशोर गवळी, संजय अकोटकर, गजानन खेडकर, अन्सार शेख, स्वप्नील चौधरी, श्रीकांत पातोंड, विशाल चौहान यांनी केली.