अकोला: जिल्हय़ातील विविध तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे सामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत.
** तेल्हारा: आपल्या विविध मागण्यांसाठी स्थानिक तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत. येथील कार्यालयात एकून २२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी २१ कर्मचारी संपावर गेल्याने विविध कामे खोळंबली आहेत. शिधापत्रिका, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी कामांसाठी कार्यालयात येणार्यांची निराशा होत आहे.
** पातुर: स्थानिक तहसील कार्यालयातील कर्मचारी १ ऑगस्टपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत. संपावर जाणार्या कर्मचार्यांमध्ये ९ अव्वल कारकून, १३ कनिष्ठ कर्मचारी, ५ शिपाई व काही कोतवालांचा समावेश आहे. कर्मचारी संपावर गेल्यामुळे कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. शासकीय कामांसाठी येथे आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना आल्यापावली परत जावे लागले.
** मूर्तिजापूर: तहसील कार्यालयातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहे. येथील कार्यालयात ९ अव्वल कारकून, ११ कनिष्ठ लिपीक, ४ शिपाई असे एकून २४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी २१ कर्मचारी संपावर गेले आहेत. केवळ ३ अस्थायी कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित आहेत.
** बाश्रीटाकळी: स्थानिक तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. सदर कर्मचारी १ ऑगस्टपासून संपावर गेल्यामुळे त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. विविध कामांसाठी तहसील कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना आल्यापावली परत जावे लागले. कार्यालयातील कर्मचार्यांपैकी केवळ ३ कर्मचारी आज कार्यालयात कर्तव्यावर असल्याचे दिसून आले.
** बाळापूर: शासन दरबारी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसुल कर्मचार्यांनी १ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प पडले आहे. बाळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयातील वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी संपावर गेले आहेत. ७ अव्वल कारकुन, १३ कनिष्ठ लिपीक, ७ शिपाई, ५ उपविभागातील असे एकून ३२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी संपात नसल्याने रोजंदारी वरील कर्मचार्यांच्या उपस्थितीत कार्यालयातील काम सुरु आहे.
** अकोला: विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचार्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. कर्मचारी संपावर असल्याने जिल्हय़ातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. नायब तहसीलदारपदाचा ग्रेड-पे वाढवून ४ हजार ६00 रुपये करण्यात यावा, महसूल विभागातील लिपिकांचे पदनाम बदलून त्याला ह्यमहसूल-सहाय्यकह्ण असे पदनाम देण्यात यावे, चतुर्थश्रेणी कर्मचारी सेवाकालापासून सेवानवृत्तीपर्यंत एकाच पदावर कार्यरत राहत असल्यामुळे त्यांच्या एका मुलाचा नोकरीसाठी विचार करण्यात यावा, नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, महसूल अधिकारी व कर्मचार्यांवर होणारे हल्ले लक्षात घेता अधिकारी-कर्मचार्यांना संरक्षण देण्यात यावे, राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्यात यावा, अशा एकूण १५ प्रलंबित मागण्या शासनाकडून मंजूर करण्यात याव्या, या मागणीसाठी महसूल कर्मचार्यांनी एल्गार पुकारला आहे. त्यामध्ये शुक्रवार, १ ऑगस्टपासून महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. या संपात जिल्हय़ातील महसूल कर्मचारी सहभागी झाले असून, कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांमधील महसूलविषयक सर्वच कामकाज ठप्प झाल्याचे चित्र शनिवारी दिसत होते. शनिवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण इंगळे, सचिव राजेंद्र नेरकर, मंगेश पेशवे,अजय तेलगोटे,अशोक वडे, विनोद वानखडे, मेधा देश्पांडे, ज्योती नारगुंडे, लता खानंदे, राजकुमार सावदेकर, अविनाश डांगे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व संपात सहभागी महसूल कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
** कार्यालय शुकशुकाट!
जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये केवळ अधिकारी उपस्थित असल्याने, कर्मचार्यांविना कार्यालयांमधील खुच्र्या रिकाम्या दिसत होत्या. तसेच कार्यालय परिसरांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. नागरिकांना हेलपाटे! महसूल कर्मचार्यांच्या बेमुदत संपामुळे विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात आणि तहसील कार्यालयात येणार्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी महसूल विभागाच्या विविध कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना काम न होताच परतावे लागले.