विवेक चांदूरकर / अकोलाजिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यात सिंदखेड व कोथडी येथे महादेवाची हेमाडपंती मंदिरे आहेत. पूर्वी या मंदिरांच्या आवारात चांदीच्या नाण्यांचा गालिचा होता. या नाण्यांवरून भाविक महादेवाचे दर्शन घेण्याकरिता जात होते. यावरून पुरातन काळी ही मंदिरे किती श्रीमंत होती, याची अनुभूती येते. श्रावण महिन्यात या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. बाश्रीटाकळी तालुक्यातील सिंदखेड येथे मोरेश्वर तर कोथडी येथे सिद्धेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात जमिनीवर दगड लावण्यात आले असून, या दगडांमध्ये चांदीचे हजारो नाणे लावण्यात आले होते. या नाण्यांवरून चालत भाविक भक्त महादेवाच्या दर्शनासाठी जात होते. मोरेश्वर मंदिराच्या गाभार्यात महादेवाची पिंड असून, समोर नंदी आहे. चार खांबावर गाभार्यासमोरील मंडप उभा आहे. मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूला दिवे लावण्यासाठी बनविण्यात आलेली दीपमाळ आहे. सध्या जमिनीवरील दगडांमध्ये असलेली चांदीची नाणे नागरिकांनी काढून नेली आहेत. काही ठिकाणचे दगडही काढून नेण्यात आले. मात्र, जे नाणे काढता आले नाही ते अजूनही त्या ठिकाणी निदर्शनास पडतात. हे मंदिर मशिदीसारखे दिसते. यामागे एक कथा गावातील नागरिक सांगतात. येथे एक मुस्लीम सरदार होता. त्याने हिंदूंची परिसरातील सर्व मंदिरे पाडली. या मंदिराला त्याला मशीद बनवायचे होते. मात्र, त्याला सैनिकांनी हे मंदिर जागृत असल्याचे सांगितले. त्यावेळी सरदाराने मंदिरातील नंदीपुढे कडबा टाकला व दारे बंद करून सैनिकांचा पहारा ठेवला. नंदीने हा कडबा खाल्ला नाही तर मंदिर पाडणार असल्याची घोषणा केली. दुसर्या दिवशी नंदीने कडबा खाल्ला असल्याचे सरदाराच्या लक्षात आल्यावर त्याने मंदिर पाडले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. येथून जवळच असलेल्या कोथडी येथे सिद्धेश्वराचे एक मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरील आवारात दगडांवर, पायर्यांवर चांदीचे नाणे रोवले होते. नागरिकांनी भिंती व पायर्यांची रंगरंगोटी केल्यामुळे चांदीचे नाणे दिसत नाहीत. या मंदिरातही महादेवीची पिंड असून, बाहेर दीपमाळ आहेत. या मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी होते.
चांदीच्या नाण्यांचा गालिचा असलेले महादेवाचे मंदिर
By admin | Updated: August 25, 2014 03:13 IST