अकोला : पेरणीनंतर अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीनचे बियाणे उगवले नाही तसेच पीक विम्याची रक्कम व गारपिटीची मदत अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी सोमवारी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली. अकोला तालुक्यात अनेक गावांमध्ये पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नाही, दुबार व तिबार पेरणी केल्यानंतरही बियाणे उगवले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बियाणे उगवले नसलेल्या शेतकर्यांच्या शेतीचा सर्व्हे अद्यापही करण्यात आला नाही. तसेच पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकर्यांना मिळाली नसून, गेल्या फेब्रुवारीमध्ये गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या मदतीपासून अनेक गारपीटग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आ. डॉ. रणजीत पाटील, मनोज तायडे, प्रकाश भोंबळे, विनोद राऊत, पांडुरंग साबळे, ज्ञानेश्वर गावंडे, संतोष घोगरे,अरुण चौधरी, रावसाहेब साबळे, प्रमोद वाघमारे, दीपक वाघमारे, अरविंद तायडे, गजानन इंगळे, उत्तम सहारे, अनिल बोर्डे, संतोष भटकर, गजानन बोर्डे व इतर शेतकरी उपस्थित होते.
सोयाबीन बियाणे उगवले नाही; पीक विम्याची मदतही नाही
By admin | Updated: August 12, 2014 01:02 IST