लोकमत न्यूज नेटवर्कउरळ/ बोरगाव वैराळे (जि. अकोला) : विसरभोळी बहीण गरोदर राहिल्याने गावात अब्रू जाण्याच्या भीतीतून दोन सख्ख्या मावसभावांनी बहिणीची गळा आवळून खून केल्याची घटना २८ मे रोजी उघडकीस आली आहे. उरळ पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दोन महिन्यांत आरोपींना जेरबंद केले आहे. प्रकरण अंगलट येऊन नये म्हणून दोन्ही भावंडांनी बहिणीचे प्रेत संग्रामपूर तालुक्यातील भेंडवळ येथे जाळले व उरळ पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली होती. मोखा गावात मागील दहा वर्षांपासून भिकाबाई (४२) ही महिला तिचा मावसभाऊ हरिभाऊ गुलाबराव घेंगे व बाळकृष्ण गुलाबराव घेंगे यांच्या घरी राहत होती. ती विसरभोळी असल्याने ती कुणासोबत बोलत नव्हती व तिला काहीच कळत नव्हते. या गोष्टींचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने तिला गर्भधारणा झाली. ही बाब समाजात आपल्या अब्रूला ठेच पोहोचविणारी असल्याने ७ मार्च २०१७ रोजी हरिभाऊ गुलाबराव घेंगे (६२) व बाळकृष्ण गुलाबराव घेंगे (६०) यांनी राहत्या घरात गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच रात्री तिचे प्रेत भेंडवळच्या जंगलात जाळले. त्यानंतर १३ मे २०१७ रोजी उरळ पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी मावसबहीण भिकाबाई दोन महिन्यांपासून हरविली असल्याची तक्रार दिली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान विजय चव्हाण यांना तक्रारकर्ते असलेले दोन मावसभाऊ यांनीच त्यांची मावसबहीण असलेल्या भिकाबाई आमले हिचा खून केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार सोमनाथ पवार व विजय चव्हाण यांनी २७ मे रोजी रात्री हरिभाऊ व बाळकृष्ण यांना ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच दोघांनी भिकाबाई ही गर्भवती राहिल्याने समाजात आपली अब्रू जाईल, या भीतीतून खून केला असल्याचे कबुली दिली, तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बुलडाणा जिल्ह्यातील भेडवळ शेतशिवारात तिचे प्रेत जाळले असल्याची माहिती दिली.उरळ पोलिसांनी हरिभाऊ व बाळकृष्ण यांना अटक केली असून, दोघांविरुद्ध खून करणे व त्याचबरोबर पुरावा नष्ट करणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साठवणे, पोलीस नायक विजय चव्हाण, संजय कुंभार, डांगे व गावंडे हे करीत आहेत.
सख्ख्या मावसभावांनी केला बहिणीचा खून
By admin | Updated: May 29, 2017 00:59 IST