लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागाने वर्तविले असताना अकोल्याचा बियाणे बाजार थंड आहे. आतापर्यंत बियाण्यांची घाऊक उचल ३० टक्क्यांपर्यंत असून, किरकोळ खरेदी केवळ १० टक्केपर्यंतच आहे.यावर्षी पावसाळा वेळेवर आणि मुबलक असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केल्याने शेतकऱ्यांपुढे अनंत आर्थिक अडचणी असताना त्यांनी शेत मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून, ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. कृषी विभागानेही यावर्षी जिल्ह्यासाठी खरिपाचे ४ लाख ८० हजार ६०० हेक्टर पेरणीचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात उन्हाचा पारा चढताच आहे. या उन्हातही शेतकरी शेतात राबताना दिसत आहे. शेतात ट्रॅक्टरची घरघर दिसत असून, रोटावेटरने शेत सपाट केली जात आहेत. यावर्षी पिकांच्या नियोजनाबाबत शेतकरी दक्षता घेत आहे. यावर्षी तुरीने कंबरडे मोडल्याने यावर्षी तुरीचा तसेच सोयाबीनची पेरणी घटणार असल्याचे कृषी सेवा केंद्र संचालकांचे मत आहे. यावर्षी १० टक्के किरकोळ व ३० टक्के घाऊक बियाणे खरेदीत कापूस बियाण्यांची मागणी अधिक असल्याची माहितीही या संचालकांनी दिली आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोयाबीनचे क्षेत्र पाच टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मूग, उडीद, ज्वारीची पेरणी वाढण्याची शक्यता आहे. या बियाण्यांची मागणी आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी सोयाबीनचे दर कमी केले असून, काही मध्य प्रदेशातील कंपन्यांनी हेच दर ठेवले आहेत. परंतु नामवंत खासगी कंपन्याचे सोयाबीनचे दर मात्र १ हजार ७०० ते १ हजार ८०० रुपये प्रती गोणी आहे. या कंपन्या प्रक्षेत्र चाचणी घेऊन बियाणे बाजारात आणत असल्याने बियाणे दरात नाममात्र कपात केल्याची माहिती कंपनीच्या सूत्राने दिली.सोयाबीन, तूर क्षेत्र घटणार!अकोला जिल्ह्यात मागीलवर्षी सोयाबीन या पिकाचे दर फारच कमी होते. दरवाढीच्या प्रतीक्षेत आजही हे बियाणे शेतकऱ्यांनी घरी राखून ठेवले आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीन कृषी विभाग ५ टक्के क्षेत्र कमी होत असल्याचे सांगत असला, तरी शेतकरी वेळेवर काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे. बाजारात घाऊक ३०, तर किरकोळ बियाणे विक्री १० टक्केच्या जवळपास झाली आहे. दमदार पाऊस पडल्यानंतरच बियाणे खरेदीला सुरुवात होईल.-मिलिंद सावजी, बियाणे अभ्यासक ,अकोला.
जिल्ह्यातील बियाणे बाजार थंड!
By admin | Updated: May 29, 2017 01:45 IST