लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तंबाखू व तंबाखूनजन्य पदार्थाचे सेवन करण्यास मनाई (नो स्मोकिंग) करण्यात येत असल्याचे फलक जिल्ह्यातील शाळा परिसरात १५ जुलैपर्यंत लावण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसह अनुदानित व खासगी शाळांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मनाई असल्याचे फलक रंगवून १५जुलैपर्यंत लावण्याचे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तंबाखू सेवन करण्याची सवय हळूहळू कमी होते, असे सांगून तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यासंदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या मोहिमेचा यशस्वी परिणाम होणार असल्याने, जिल्ह्यातील शाळांमधून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. तंबाखू सेवनामुळे जगात वर्षाकाठी ४० लाख लोकांचा मृत्यू होतो, असे सांगत भारतात दर चार मिनिटाला एक मृत्यू तंबाखू सेवनाने होतो. त्यामुळे यासंदर्भात जनजागृती करण्याची आवश्यकता असून, जिल्ह्यात तंबाखू सेवन निर्मूलनाच्या कार्यात डेन्टल असोसिएशन सहकार्य करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी जळगाव येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. गोविंद मंत्री, डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक (मुंबई) उपस्थित होते.
जिल्ह्यातील शाळा परिसरात लावणार ‘नो स्मोकिंग’चे फलक!
By admin | Updated: May 31, 2017 01:39 IST