वाशिम : जिल्हाभरातील तहसील तथा भूमिअभीलेख कार्यालयातील महत्वाच्या दस्तऐवजाचे जतन करण्यासाठी यावेळच्या महसुल दिनापासून त्या दस्तऐवजाच्या स्कॅनींगची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाशिम उपविभाग कार्यालयांतर्गत येणार्या वाशिम तहसील कार्यालयात या मोहीमेचा शुभारंभ वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांच्या हस्ते व अप्पर जिल्हाधिकारी एल. बी. राउत, वाशिमचे तहसीलदार आशिष बिजवल, भूमी अभिलेखचे अधीक्षक हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकार्यांनी भूमिशी संबंधीत दस्तऐवजाचे महत्व लक्षात घेवून शासनाने महसुल दिनापासून भूमी अभिलेख व तहसील कार्यालयातील सर्व महत्वाच्या दस्तऐवजाचे स्कॅनींग करुन त्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला अनुसरुन वाशिम जिल्ह्यातही ही मोहीम महसुल दिनापासून राबविल्या जात आहे. या मोहिमेमुळे शेकडो वर्षापासून तहसील वा भूमी अभिलेख कार्यालयात जिर्णावस्थेत पडून असलेल्या व कोणत्याही क्षणी नष्ट होउ शकणार्या दस्ताऐवजांना संजीवनी मिळणार आहे. अर्थात स्कॅनीग केलेल्या दस्तऐवजात काही स्पष्ट न दिसल्यासच मुळ दस्तऐवज उघडण्याची गरज पडणार आहे. जिल्ह्यातील सहाही तालूक्यातील दस्ताऐवजाचे स्कॅनींग झाल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातील संगणकात साठविल्यानंतर त्या दस्तऐवजाला महाईसेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचाही प्रयत्न शासन, प्रशासनाच्या माध्यमातून करणार आहे.
भूमिशी संबंधीत दस्तऐवजाच्या जतनासाठी स्कॅनिंग मोहीम
By admin | Updated: August 5, 2014 00:18 IST