यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर २३ जानेवारी रोजी वाळूमाफिया अविनाश चव्हाण व त्याच्या सहकाऱ्यांनी चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेचा निषेध करीत, हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने २ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले होते. या सामूहिक रजा आंदोलनात जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सहभाग घेतला. नायब तहसीलदारावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध नोंदवित हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी व संघटनेचे विभागीय सचिव संजय खडसे, अनिल खंडागळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष तहसीलदार विजय लोखंडे, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, डाॅ.रामेश्वर पुरी, अभयसिंह माहिते, सतश काळे, संतोष शिंदे, संतोष येवलीकर, सदाशिव शेलार, मीरा पागोरे, राहूल वानखेडे, प्रदीप पवार, नीलेश मडके, अजय तेलगोटे, स्वप्नाली काळे, अजय तेलगोटे आदी उपस्थित होते. महसूल अधिकारी सामूहिक रजेवर असल्याने मंगळवारी जिल्ह्यातील महसूल विभागांतर्गत कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालये व उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयांत विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना काम न होताच परतावे लागले.
.................................फोटो........................