वाशिम: कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून कुक्कुटपालनासाठी आर्थिक सहकार्य करण्यात येणार असल्याने, यापुढील काळात महिला बचत गटाचे सदस्य मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन उद्योगाकडे वळतील असे चित्र, ह्यकम्युनिटी मॅनेज्ड रिसोर्स सेंटरह्ण (सीएमआरसी)तर्फे महिलांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणातील उत्स्फूर्त सहभागावरून दिसून येत आहे. विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांमधील तब्बल १९,२00 कुटुंबांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.विदर्भातील सहा जिल्हयातील शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून, शेतकरी, शेतमजुर, महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून शेतीशी निगडीत असे उद्योग उभारण्यात येत आहेत. आता ग्रामीण भागातील महिलांना कुक्कुटपालन हा लघुउद्योग सुरू करता यावा, यासाठी ३0 टक्के अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. सदर उद्योग सक्षमपणे उभा रहावा याकरीता महिलांना उद्योगाविषयी सखोल मार्गदर्शन देण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्हयांमधील एकूण ६४ क्लस्टरमधील प्रत्येक कलस्टरमधील ३00, याप्रमाणे १९,२00 कुटुंब सदस्यांचा या योजनेत सहभाग राहील. सध्या वाशिम जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील २५ गावांमधील ३00 महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या तयारीस प्रारंभही झाला आहे. कुक्कुटपालन व्यवसाय उभारणीकरीता एकूण ७,५00 रूपये गुंतवणूक करण्याची आवश्यकता असून, त्यापैकी ३0 टक्के रक्कम कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. वाशिम जिल्हयातील सहा तालुक्यांमध्ये महिला बचत गटाच्या एकूण २,१00 महिला सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक प्रा. शरद व्ही.कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.