बार्शीटाकळी : वंचित बहुजन आघाडीने सक्रिय कार्यकर्त्या तालुका महिला अध्यक्षा कविता राठोड यांना डावलून राजकारणाशी संबंधित नसलेल्या उमेदवार दिल्याने दगडपारवा जिल्हा परिषद सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये बंडाळी होण्याची शक्यता आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत वंचितमध्ये बंडाळी झाल्याने राजंदा व दगडपारवा जिल्हा परिषद सर्कल वंचित बहुजन आघाडीला पराभवाचे तोंड पहावे लागले होते. राजंदा सर्कलमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पॅनेलच उभे केले होते. हीच परिस्थिती आजही आहे. दगडपारवा जिल्हा परिषद सर्कलमध्ये उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार म्हणून महिला अध्यक्षा कविता राठोड यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून उमेदवारीचे आश्वासनदेखील मिळाले होते. दगडपारवा सर्कल महिलाकरीता राखीव निघाले असताना, कविता राठोड यांना डावलून पक्षाने उज्ज्वला सुनील जाधव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. उज्ज्वला जाधव या डॉ. सुनील जाधव यांच्या पत्नी आहेत. डॉ. सुनील जाधव यांना पक्षाने पंचायत समितीचे सभापती पद दिले होते. तरीही मागील दगडपारवा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी वंचित विरूद्ध बंडाळी केली होती. त्यामुळे वंचितला जागा गमवावी लागली होती. आता जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे दगडपारवा जिल्हा परिषद सर्कल वंचितमध्ये बंडाळीची शक्यता नाकारता येत नाही.
एक जिल्हा परिषद, चार पंचायत समितीच्या जागा
बार्शीटाकळी तालुक्यात जिल्हा परिषद सर्कल दगडपारवा गट, चार पंचायत समिती सर्कल दगडपारवा गण, मोऱ्हळ गण, महान गण व पुनोती गण अशा पाच ठिकाणी ओबीसी उमेदवार असलेल्या रिक्त गट, गण ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे.
४३ हजार मतदार
एक जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांकरिता ४३ हजार ५५७ स्त्री-पुरुष मतदार ६० केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दगड पारवा गटात ३६ गावे व १६ ग्रामपंचायती आहेत. पुरुष मतदार ७ हजार ४८३ तर स्त्री मतदार ७ हजार ४८ असे एकूण १४ हजार ५३१ मतदार असून २१ मतदान केंद्रे आहेत. दगडपारवा गणात १८ गावे व ६ ग्रामपंचायती आहेत. पुरुष मतदार ३ हजार ५५२ तर स्त्री मतदार ३ हजार १७६ असे एकूण मतदार ६ हजार ७२८ मतदार असून ९ मतदान केंद्रे आहेत.
मोऱ्हळ गणात १० गावे व ७ ग्रामपंचायती आहेत. पुरूष मतदार ३ हजार ५४४ तर स्त्री ३ हजार ३४६ असे एकूण ७ हजार २०० मतदार असून मतदान ९ मतदान केंद्रे आहेत.
महान गणात ८ गावे व २ ग्रामपंचायती आहेत. पुरुष मतदार ३ हजार ७०३ तर स्त्री मतदार ३ हजार ४९७ असे ८ हजार १०८ मतदार असून ८ मतदान केंद्रे आहेत.
पुनोती गणात १४ गावे व ८ ग्रामपंचायती आहेत. पुरुष मतदार ४ हजार २५० स्त्री मतदार ३ हजार ८५८ असे एकूण ८ हजार १०८ मतदार असून ११ मतदान केंद्रे आहेत.
एक गट, चार गणांकरीता पुरुष स्त्री मतदार एकूण ४३ हजार ५५७ मतदार ६० मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत.