अकोला: तोष्णीवाल लेआऊटमधील शिकवणी वर्गामध्ये गुंडांकडून विद्यार्थ्यांना होणारा त्रास लोकमतने वाचकांसमोर मांडून परिसरात पोलिस चौकीचीही मागणी उचलून धरली होती. या मागणीची दखल घेत, अखेर परिसरात पोलिस चौकी उभारणीस पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी मंजुरी दिली. शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षकांनी पोलिस चौकीचा शुभारंभ केला. तोष्णीवाल लेआऊटमधील शिकवणी वर्गामध्ये बाहेरगावाहून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या ठिकाणी गुंडप्रवृत्तीच्या युवकांकडून खंडणी वसूल करणे, लूटमार, मारहाण करणे, विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. याप्रकरणी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करून परिसरात फिरणार्या गुंडांच्या बंदोबस्तासोबतच पोलिस चौकीचीही मागणी केली. या मागणीला नगरसेवक आशीष पवित्रकार, प्राध्यापक मंडळींसह नागरिकांनी पाठिंबा दिला. परिसरातील नागरिक, प्राध्यापक व पोलिसांची बैठकसुद्धा पार पडली. ठाणेदार प्रकाश सावकार यांनी पोलिस चौकी उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्याकडून पोलिस चौकी मंजूर करून घेत, शनिवारी सायंकाळी चौकीचे उद्घाटनदेखील केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, ठाणेदार प्रकाश सावकर,भाजपा नगरसेवक आशीष पवित्रकार, डॉ. गजानन नारे, गणेश पोटे, प्रा. मुकुंद पाध्ये आदी होते. कार्यक्रमाला प्रा. सपकाळ, प्रा. विवेक शास्त्रकार, प्रा. भालचंद्र सुर्वे, भरत राजे, बाळूभाऊ पवित्रकार, भास्कर खिराळे, सुभाष तोष्णीवाल, रोहिदास भोयर, श्रीराम वरठी, उमाळे, ठोमरे, योगेश खिराळे, पुंडकर, तळोकार, बाहेती, हेमंत थाडा, यांच्यासह पीएसआय शेरजे, पोलिस कर्मचारी पप्पू ठाकूर, राजू सुरत्ने, नीलेश खंडारे, उमेश सुगंधी, दीपक वरोटे, संजय डोंगरदिवे, दिनेश सोनकामळे, खुशाल नेमाडे यांच्यासह परिसरातील नागरिक व शिकवणी वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.
तोष्णीवाल लेआऊटमध्ये पोलिस चौकी
By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST